Maharashtra Breaking News LIVE 04 October 2024 : अहमदनगर नव्हे अहिल्यानगर, केंद्र सरकारने दिली मंजूरी
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 04 ऑक्टोबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय काल जाहीर केला. या निर्णयामुळे जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही पक्षांकडून उमेदवारांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आज सकाळी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मोठे निर्णय घेतले जाणार आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
लखनऊमध्ये सिलेंडरच्या स्फोटामुळे झोपडपट्टीला आग लागली
लखनौमधील संजय नगर चौकात एका झोपडपट्टीला आग लागली. सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर ही आग लागल्याचे प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच बाजार खळा पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि नियंत्रण मिळवलं.
-
राहुल गांधींना भाषण कसे करायचे ते कळत नाही: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, राहुल गांधींना भाषण कसं करायचं हेही कळत नाही. काँग्रेसने नेहमीच संविधानाचा अपमान केला आहे. बाबासाहेब कायदामंत्री असतानाही त्यांचा अपमान झाला. डॉ.आंबेडकरांच्या सर्वच ठिकाणी मोदी सरकारने मोठा विकास केला आहे. दीक्षाभूमी ते चैत्यभूमीपर्यंत सुधारणा केल्या आहेत. विरोधक संविधानाबाबत खोटे बोलतात.
-
-
छत्तीसगडच्या नारायणपूर आणि दंतेवाडामध्ये 7 नक्षलवादी ठार
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.
-
एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला जाणार
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर इस्लामाबाद येथे होणाऱ्या SCO बैठकीत सहभागी होण्यासाठी शिष्टमंडळासह पाकिस्तानला जाणार आहेत. ही बैठक 15 ते 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
-
अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतर
अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतरास केंद्र सरकारची मंजूरी मिळाली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे दौऱ्यावर
महिला सशक्तीकरण कार्यक्रमासह विविध प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ठाण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाण्यातील घोडबंदर रोड भागात दौरा आयोजित करण्यात आला आहे. घोडबंदर रोडवरील वालावलकर मैदानावर उद्या संध्याकाळी 4 वाजता भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मोठी जय्यत तयारीही केली जात आहे.
-
शेवगाव – पाथर्डी मतदारसंघात भाजपमध्ये उभी फुट
शेवगाव – पाथर्डी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विद्यमान भाजपा आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेतला. ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड आणि प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी निर्धार मेळावा घेऊन केली राजळे विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. येणाऱ्या विधानसभेत उमेदवार बदलावा अन्यथा आम्ही वेगळी भूमिका घेऊ, असा इशारा त्यांनी दिला.
-
नैना प्रकल्पाला शेकापचा विरोध
उद्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या नैना प्रकल्पाला शेतकरी कामगार पक्षाने विरोध केला आहे. शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी विरोध दर्शविला आहे. नैना प्रकल्पाच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करत आहे. रायगड पनवेलमधून होणाऱ्या नैना प्रकल्पाला स्थानिक शेतकरी आणि महाविकास आघाडी शेकापने विरोध दर्शविला आहे
-
संजय राऊत यांचावर धुळ्यात नाराजी
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावर प्रसंगी ठाकरे गटाचे सेनेचे नेते संजय राऊत हे वेळेवर उपस्थित न झाल्याने धुळ्यातील छत्रपती संभाजी महाराज समितीच्या वतीने संभाजी महाराजांच्या स्मारकाला कुलूप लावले आहे. काही वेळात संजय राऊत हे पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उशिरा येणार होते मात्र कार्यक्रमाला उशीर झाला या नाराजी या ठिकाणी स्मारकाच्या भेटला समितीच्या कार्यकर्त्यांनी कुलूप लावत संजय राऊत यांचा निषेध केला आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
प्रत्येकाला वाटते मराठे कुटा कुटी का करत नाही..आपण सायलेंट राहायचे..आपण मौन पकडले तरी याना वाटते आता काही तरी होणार आहे. आपल्याला धोका दिला तर, यावेळी आडवा आणि उभा नांगर हाणायचा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
-
पुण्यातील बलात्कार प्रकरणात आरोपीचे स्केच तयार
पुण्यात मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी संशयितांचे स्केच पोलिसांनी तयार केले आहे. स्थानिक पोलिसांसह पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत. जवळच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासले जात आहेत
-
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 41 निर्णय
राज्य मंत्रिमंडळाची आज 4 ऑक्टोबर रोजी बैठक पार पडली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटकांना खूश करण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीत एकूण 41 निर्णयांना हिरवा कंदील दाखवण्यात आला.
- राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ ( महसूल विभाग)
- महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार (महसूल विभाग)
- दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन (महसूल विभाग)
- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास मान्यता (जलसंपदा विभाग)
- टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व. अनिल भाऊ बाबर यांचे नाव ( जलसंपदा विभाग)
- पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार सिल्लोड मधील जमिनीला सिंचन (जलसंपदा विभाग)
- प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद (पर्यटन)
- राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिक रक्कम वाढवली (क्रीडा विभाग)
- राज्यातील आणखी 104 आयटीआय संस्थांचे नामकरण ( कौशल्य विकास)
- संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार (सामाजिक न्याय विभाग)
लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण (जलसंपदा विभाग)
- कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या ( मदत व पुनर्वसन विभाग)
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ( वैद्यकीय शिक्षण)
- राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे (वैद्यकीय शिक्षण)
- जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ (अल्पसंख्याक विकास विभाग)
- महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ ( पदुम विभाग)
- आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार (मृद व जलसंधारण)
- बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल (ग्रामविकास विभाग)
- कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय (वैद्यकीय शिक्षण विभाग)
- महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार (मत्स्य व्यवसाय विभाग)
- कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव (मृद व जलसंधारण विभाग)
- बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे ( इतर मागासवर्ग विभाग)
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार 2604 कोटीस मान्यता ( मृद व जलसंधारण विभाग)
- राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार १ लाख ६० हजार कोटींचे गुंतवणूक अपेक्षित (उद्योग)
- उच्च तंत्रज्ञानावरील अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन (उद्योग विभाग)
- राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण (मृद व जलसंधारण विभाग)
- शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार (जलसंपदा विभाग)
- बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना (अल्पसंख्याक विकास विभाग)
- सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार (विमानचालन विभाग)
- वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार (सार्वजनिक आरोग्य विभाग)
- डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना (उच्च व तंत्र शिक्षण)
- वडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठी (महसूल)
- रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढ. (सामाजिक न्याय)
-
बैठकीत राष्ट्रवादीला चिंचवड विधानसभा सोडण्यात यावी अन्यथा भाजपच्या उमेदवाराचे काम न करण्याचा ठराव
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड मतदारसंघावरुन महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. चिंचवड विधानसभेत आज अजित पवारांच्या माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. बैठकीत राष्ट्रवादीला चिंचवड विधानसभा सोडण्यात यावी अन्यथा भाजपच्या उमेदवाराचे काम न करण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी नाना काटे,मोरेश्वर शेडगे, मयूर कलाटे, प्रशांत शितोळे यांच्यासह इतर चिंचवड विधानसभेतील माजी नगरसेवक उपस्थित होते. याबाबत ते उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलणार आहेत.
-
धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी
धुळ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय राऊत धुळ्यात आहेत. थोड्याच वेळात संजय राऊत हे गुलमोहर रेस्ट हाऊस येथे विधानसभानिहाय बैठका घेणार आहेत. धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत.
-
नारायण गडावर सर्वांनी दसरा मेळाव्याला यावे, जरांगे यांचे आवाहन
नारायण गडावर सर्वांनी दसरा मेळाव्याला यावे असे थेट जरांगे यांनी लोकांना आवाहन केले आहे.
-
मंत्रालयात आदिवासी समाजाचे आमदार आक्रमक
मंत्रालयात आदिवासी समाजाचे आमदार आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय
-
मंत्रालयात आदिवासी समाजाच्या आमदारांचे ठिय्या आंदोलन
मंत्रालयात आदिवासी समाजाच्या आमदारांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.
-
आमदारांच्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या
राज्यातील राजकारणात खळबळजनक बातमी आली आहे. राज्यातील आदिवासी समाजातील आमदारांनी मंत्रालयातील जाळीवर उडी मारल्या आहे. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी आमदारांची आहे.
-
मराठा आंदोलकांनी फासले श्रावण देवरे यांच्या घराला काळे
मराठा आंदोलकांनी फासले श्रावण देवरे यांच्या घराला काळे फासले आहे. तसेचआंदोलकांनी घराला बांगड्या देखील लावल्या. श्रावण देवरे यांनी केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
-
मनोज जरांगे पाटील नवीन कार्यालयात
धुळे सोलापूर महामार्ग पैठण फाटा येथे छत्रपती भवन नावाने जरांगे पाटील यांचे नवीन संपर्क कार्यालय सुरू होत आहे, या कार्यालयाचे उद्घाटन स्वतः मनोज जरांगे पाटील आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते पार पडत आहे
-
हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या गटात
इंदापूर तालुका स्वाभिमानी तालुका आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारा तालुका आहे. आपल्याला आज अंतिम निर्णय घ्यायचा आहे, असे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय जाहीर केला.
-
शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीवर हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
“इंदापूर तालुका स्वाभिमानी. आपल्याला अंतिम निर्णय घ्यायचा आहे का?. काल माझी शरद पवारांसोबत बैठक झाली. विधानसभा लढवा, तालुक्यातील लोकांचा आग्रह असं पवारांनी सांगितलं” हर्षवर्धन पाटील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत आहेत. हर्षवर्धन पाटलांची भाजपाला सोडचिठ्ठी.
-
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अपडेट
पीडित मुलीच्या नातेवाईकांनी जामीन फेटाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कल्याण न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या विरोधात करणार याचिका दाखल. नातेवाईकांनी पीडित मुलीसाठी नवीन वकील नियुक्त करण्याचा घेतला निर्णय. काल कल्याण न्यायालयाने एका गुन्ह्यात दोन्ही आरोपींना जमीन देत दुसऱ्या प्रकरणात एक दिवसांची सुनावली होती पोलीस कोठडी. आज उदय कोतवाल आणि तुषार आपटे याची एक दिवसाची पोलीस कोठडी संपत असून थोड्या वेळात दोन्ही आरोपींची दुसऱ्या गुन्हात कल्याण न्यायालयात होणार सुनावणी.
-
निवडणुकीच्या तोंडावर स्टेटमेंट करू नका, मनोज जरांगे पाटील
“शरद पवार यांची मागणी चांगली, पण ही वेळ नाही. 13 महिन्यापूर्वी मागणी करायला पाहिजे होती. आम्हाला अगोदर 50 टक्क्यांच्या आत, आता 27 टक्क्यांच्या आत पाहिजे. हुल देण्याचे थांबवा, बहाणेबाजी थांबवा. निवडणुकीच्या तोंडावर स्टेटमेंट करू नका. न होणाऱ्या गोष्टी सांगू नका” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
दुसऱ्याच्या बारशाला जाऊन ह्यांना नाचण्याची सवय, नितेश राणेंची बोचरी टीका
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन भाजपा नेते नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “काही डोमकावळे आम्ही केल असं बोलायला पुढे आलेले आहेत. दुसऱ्याच्या बारशाला जाऊन नाचण्याची ह्यांना सवय झाली आहे. 2014 ते 1019 पर्यंत सत्तेत होते तेव्हा आपल्या मेहुण्याला वाचवण्यासाठी आणि मातोश्री 2 साठी जेवढा आग्रह धरला तेवढा मराठी भाषेसाठी कधीच धरला नाही” अशी टीका नितेश राणे यांनी केली.
-
राज्यात सध्या आरक्षणावरून संघर्ष सुरू – संजय राऊत
राज्यात सध्या आरक्षणावरून संघर्ष सुरू आहे. जातीवरून महाराष्ट्र दुभंगल्यासारखा वाटात आहे. अनेक नेते उपोषण करत आहेत, त्यांच्या प्रकृतीची आम्हाला चिंता वाटते, असं संजय राऊत म्हणाले
-
चंद्रपूर : कोरपणा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात संबंधित शाळेच्या संचालकावर गुन्हा दाखल
चंद्रपूर : कोरपणा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात संबंधित शाळेच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत लोडे (35) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संचालकाचे नाव असून तो आरोपी अमोल लोडेचा चुलत काका असून शाळेच्या संचालक मंडळावर देखील आहे . pocso च्या कलम 21 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अत्याचाराची घटना माहीत असून देखील पोलिसांत याची तक्रार केली नाही म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी स्कूलबस देण्यासाठी पत्र
लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी स्कूलबस देण्यासाठी छत्रपती संभाजी नगरच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना दिलं पत्र. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना दिल्याची पत्रात माहिती.
सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी स्कूलबस देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र स्कूलबस देण्यास विरोधकांनी विरोध दर्शवला आहे.
-
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने नाशिकमध्ये शिवसेनाचा आनंदोत्सव
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने नाशिकमध्ये शिवसेनाचा आनंदोत्सव. शिवसेना शिंदे गटाकडून नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारका बाहेर जल्लोष करण्यात आला. मराठी भाषेचा जयघोष करत, फटाक्यांची आतीषबाजी करत, पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला.
-
Maharashtra News: रेल्वे सुरक्षा बल स्थापना दिवस नाशिकमध्ये होतोय साजरा
रेल्वे परेड ग्राऊंडवर होणार विविध प्रात्यक्षिक… केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती… नाशिकच्या रेल्वे ट्रेनिंग सेंटर येथे दिमाखदार सोहळ्यास प्रारंभ… ४०वा रेल्वे सुरक्षा बल स्थापना दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन… रेल्वे अधिकाऱ्याना आज करणार विविध पुरस्काराने सन्मानित…
-
Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जिल्ह्यातील तीन जागांवर दावा
पैठण, गंगापूर आणि छत्रपती संभाजीनगर मध्य जागांवर सांगितला दावा… तर जिल्ह्यातील नऊ जागांसाठी 46 अर्ज आल्याची माहिती… शरद पवार गटाकडून तीन जागावर दावा केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची अडचण… पैठण आणि छत्रपती संभाजीनगर मध्य जागेवर शिवसेनेचे होते आमदार… मात्र या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून दावा…
-
Maharashtra News: संतोष वडवळ आणि त्यांच्या वडिलांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
संतोष वडवळ आणि त्यांच्या वडिलांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल… शिवीगाळ, मारहाण केल्याचा फिर्यादी बालाजी कोकरेंचा आरोप… संतोष वडवळ यांनी मारहाण होण्यापूर्वी शिवीगाळ केल्याचा आरोप…
-
Maharashtra News: मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्याकडून प्रचाराला सुरुवात
रमेश कदम यांच्याकडून मतदारसंघात एलईडीद्वारे प्रचार सुरू… रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार असून आगामी विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम… राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारीचे प्रयत्न सुरू… रमेश कदम यांनी आत्तापर्यंत चार वेळा शरद पवारांची भेट घेत मोहोळ विधानसभेची उमेदवारी मागितली आहे…
-
Maharashtra News Live : राज ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर
नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. 5 ते 6 ऑक्टोबर असे दोन दिवस राज ठाकरे हे नाशिकमध्ये आढावा बैठक घेणार आहेत. तर 6 ऑक्टोबर राज ठाकरे हे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
-
Maharashtra News Live : अजित पवार एकविरा आईचे दर्शन घेणार
मावळ/पुणे :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. अजित पवार हे लोणावळ्यातील कार्ला गडावर एकविरा आईचे घेणार दर्शन घेणार आहेत. कार्ला गडावरील विविध विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत.
-
Maharashtra News Live : कल्याण-डोंबिवलीत विधानसभा इच्छुकांची बॅनरबाजी
कल्याण-डोंबिवलीत नवरात्र उत्सवात विधानसभा इच्छुक उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे. सध्या शहरभरात बॅनर आणि कमानी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे जनसंपर्कात राहण्याचा प्रयत्न केला जात आहे. इच्छुक उमेदवारांच्या बॅनर आणि कमानींमुळे कल्याण डोंबिवली हे कमानींचे शहर झाले आहे.
-
Maharashtra News Live : गोपाल अरबट यांच्या कारवरील गोळीबार प्रकरणी नवा ट्वीस्ट
अमरावती : अमरावतीमधील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या इनोव्हा कार वरील गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. 30 सप्टेंबरला रात्री ज्यावेळी गोपाल अरबट यांच्या इनोव्हा कारवर ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते ठिकाण आणि गोपाल अरबट यांचे तेव्हाचे मोबाईल लोकेशन यामध्ये तफावत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. गोपाल अरबट यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात वाहनात मी एकटाच असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र गोपाल अरबट यांच्या सोबत त्यांचा चालक असल्याची माहिती समोर आली आहे.
-
Maharashtra News Live : दिलीप वळसे पाटलांची डोकेदुखी वाढणार, विधानसभेतील इच्छुकांच्या संख्येत वाढ
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून देवदत्त निकमांनंतर आता रमेश येवले यांनी दंड थोपटले आहेत. सध्या रमेश येवले यांनी गावागावांत शक्तीप्रदर्शन सुरु केलं आहे. तर दुसरीकडे उबाठा गटाच्या शिवसेनेतून जिल्हाध्यक्ष सुरेश भोर यांनी आंबेगाव विधानसभा मतदार संघावर दावा केला आहे. हा मतदार संघ शिवसेनेला मिळावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांविरोधात आंबेगाव तालुक्यात इच्छुकांची संख्या वाढल्याने वळसे पाटीलांची डोकेदुखी वाढणार आहे.
Published On - Oct 04,2024 8:57 AM