पडद्यामागे चाललंय काय? विदर्भातील दोन नेते ठाकरे गटाच्या गळाला?; सुषमा अंधारे यांनी महायुतीचं टेन्शन वाढवलं
चंद्रशेखर बावनकुळे आपलं सनातन दुःख लपवत आहेत. फक्त भाजप आणि महायुतीच नाही तर बावनकुळे सुद्धा "अंदर से बहुत तूट चुके है'. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची भाषा केल्यावर बावनकुळे यांच्या मनात देखील लाडू फुटत आहेत, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा पालापाचोळा झाला आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये धास्ती निर्माण झली आहे. महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं विधान केलं आहे. आमच्याकडेही आता इन्कमिंग सुरू होणार आहे. विदर्भातील दोन महत्त्वाचे नेते आमच्याकडे येणार आहेत, असा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांच्या या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे. विदर्भातील हे दोन नेते कोण आहेत? याची चर्चा सध्या राज्यात सुरू झाली आहे.
सुषमा अंधारे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला. सर्व आमदारांमध्ये एक अस्वस्थता असल्याचं समोर येत आहे. पण संपर्कात असणारी लोक नेमके कोणती आहेत ते माहिती नाही. पण मराठवाड्यातल्या लोकांची शक्यता नाकारता येत नाही. कारण मराठवाड्यात तसं वातावरण आहे. अब्दुल सत्तारांच्या मनात देखील अस्वस्थता असू शकते मी हे उदाहरण म्हणून सांगत आहे. कुणाला सोबत घ्यायचं किंवा कुणाला नाही घ्यायचं हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. ज्यांना ब्लॅकमेल करून घेण्याचा प्रयत्न केला गेला ते आले तर स्वागत. नाईलाजाने गेलेल्या लोकांना घ्यायला हरकत नाही. जे लोक ठरवून गेले, स्वतःच्या चुका लपवण्यासाठी पक्ष बदनाम केला अशा लोकांना घ्यायला शिवसैनिक देखील सकारात्मक नाहीत, असं सांगतानाच आमच्याकडे इन्कमिंग निश्चित सुरू होईल. विदर्भातले दोन मोठे नेते विधानसभेत आमच्या सोबत येणार आहेत, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.
मोदी सत्तेशिवाय राहू शकत नाहीत
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री शिंदे यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आता तरी कमी होईल. आम्ही सध्या गॅलरीत बसलो आहोत. गॅलरीमध्ये बसून आम्ही बघत आहोत की सत्ता कशी स्थापन होते. मोदी पंतप्रधान व्हावेत अशी जनतेची इच्छा आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत ही जर लोकांची इच्छा असती तर लोकांनी तुम्हाला बहुमत दिल असतं. तुम्हाला 272 चा आकडा गाठता आला नाही. लोकांनी तुम्हाला स्पष्ट बहुमत दिल नाही. 400 जागांच्या ढिंग्या हाणत होते, तुम्हाला 272 क्रॉस करता आले नाही. नरेंद्र मोदी सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. सत्ते शिवाय मोदी म्हणजे पाण्याविना तडपणारा मासा, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
फडणवीस यांची गच्छंती अटळ
देवेंद्र फडणवीस यांनी पराभव मान्य केला असं वाटत नाही. फडणवीस सध्या दबाव तंत्राचा वापर करत आहेत. राज्यात फडणवीस यांच्याबद्दल नकारात्मकता निर्माण झालेली आहे. त्यांची प्रतिमा खराब झाली आहे. त्याचा तोटा भाजपला सहन करावा लागत आहे. केंद्रीय नेतृत्व जाब विचारत आहे. त्यामुळे फडणवीस यांची गच्छंती अटळ आहे, हे त्यांच्या लक्षात आलं आहे. भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना मोठं केलं ते कुणीच बोलत नाहीत, असंही त्या म्हणाल्या.