नाशिकच्या आश्रमशाळेत 2 मतिमंद विद्यार्थ्यांचा विषबाधेने मृत्यू तर चार जणांची प्रकृती गंभीर; पोलिस घटनास्थळी दाखल
इगतपुरी शहरात मतिमंद मुलांची शाळा असून या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत ही घटना घडली. या महाविद्यालयात 120 विद्यार्थी आहेत. मंगळवारी रात्री आश्रमशाळेतील मुलांना खिचडीचे जेवण देण्यात आले. बुधवारी पहाटेच्या सुमारास 8 विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला होता.
नाशिक : आश्रमशाळेतील 2 मतिमंद विद्यार्थ्यांचा विषबाधेने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमधील(Nashik) इगतपुरी(Igatpuri) येथील अनुसूयात्मजा मंतिमंद विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत(Anusuyatmaja ashram school) हा धक्कादायक प्रकार घडलाय. विषबाधेमुळे दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. अन्नातून किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घतेली आहे. जिल्हाधिकारी तसेच अप्पर पोलीस अधिक्षिका घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची सविस्तर माहिती घेत आहेत.
जिल्हाधिकारी तसेच अप्पर पोलीस अधिक्षिका घटनास्थळी
अनुसूयात्मजा मतिमंद निवासी विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू प्रकरणी आता शासनाच्या हालचाली ना वेग आला आहे. दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दोन विद्यार्थी हे गंभीर असून चार ते पाच विद्यार्थ्यांना तपासणीसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. नाशिक जिल्हाधिकारी डी. गांगाधरण तसेच प्रांताधिकारी तेजस चव्हाण, अप्पर पोलीस अधिक्षिका माधुरी कांगणे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची सविस्तर माहिती घेतली जात आहे.
नाशिक आरोग्य विभागाने दिली आश्रमशाळेला भेट
नाशिक आरोग्य विभागाचे उपसंचालक रघुनाथ भोईर यांनी देखील घटनेची माहिती मिळताच अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालयाला तात्काळ भेट दिली. दोन मुलांना जुलाब उलट्याचा त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे त्यांना नाशिक जिल्हा रूग्णालत पाठवले आहे. तर पाच विद्यार्थ्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात भरती केली आहे. निवासी विद्यालयातील उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली असून विद्यार्थ्यांचा मृत्यू डायरीया मुळे झाल्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
आश्रमशाळेत नेमकं झाल काय?
इगतपुरी शहरात मतिमंद मुलांची शाळा असून या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत ही घटना घडली. या महाविद्यालयात 120 विद्यार्थी आहेत. मंगळवारी रात्री आश्रमशाळेतील मुलांना खिचडीचे जेवण देण्यात आले. बुधवारी पहाटेच्या सुमारास 8 विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. हर्षल गणेश भोईर (23, रा. भिवंडी, जि. ठाणे) व मोहम्मद जुबेर शेख (11, रा. नाशिक) अशी मृतकांची नावे आहेत. तर प्रथमेश निलेश बुवा (17) व देवेंद्र कुरुंगे (15) या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.
वैद्यकीय अधिकारी गैरहजर
या घटनेची माहिती समजताच ग्रामीण रुग्णालयात तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख सदर विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार केला. एवढी मोठी घटना घडुनही इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप इंगोले व भरारी पथक अधीक्षिका डॉ. स्वरूपा देवरे मात्र गैरहजर असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
कारवाईची मागणी
या विद्यार्थ्यांच्या जेवणात असलेल्या अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मृत विद्यार्थ्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ॉनाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयात पोलिस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मुख्याधिकारी पंकज गोसावी, नायब तहसीलदार प्रविण गुंडाळे, आरोग्य निरीक्षक यशवंत ताठे आदी उपस्थित होते. या घटनेबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी अधिवेशनात दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.