‘नुसते विधान भवनात येतात अन्…’, ठाकरेंच्या आरोपांना सामंतांचं खोचक प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर आता मंत्री उदय सामंत यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नुकतंच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं या अधिवेशनावरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अपयश लपवणारं अधिवेशन होतं, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान त्यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची दोस्ती पक्की आहे. उद्धव ठाकरे बालिशपणा करत आहेत, शिवसेना खरी कोणाची? हे न्यायालयाने आधीच सिद्ध केलं आहे. आम्ही 80 जागा लढलो 60 जागा जिंकलो, ते फक्त 20 जागाच जिंकले, त्यांच्या हातात आता काही राहिलं नाही, ते काँग्रेसच्या तालावर नाचत आहेत, असा हल्लाबोल सामंत यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसबरोबर जाऊन त्यांनी बाळासाहेब यांच्यासोबत गद्दारी केली. सौगात हा मोदींचा उपक्रम आहे. यांनी फेक नरेटीव्ही सेट केला आहे. आम्ही पाकिस्तानचं समर्थन करत नाही, यांनी कंगनाच्या घरावर कारवाईसाठी बुलडोझर पाठवला. राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस पाठवले. यांनी जे कृत्य केले ते पुसले जाणार नाहीत असं सामंत यांनी म्हटलं आहे.
अधिवेशनामध्ये प्रत्येक घोषणेवर चर्चा झाली आहे. आम्ही आमचा अजेंडा पाच वर्षांमध्ये पूर्ण करणार आहोत. यांना जे जमले नाही ते आम्ही केले आहे. गिरीश महाजन यांना एका प्रकरणात यांनी अटकवण्याचा प्रयत्न केला. नुसती विधान भवनात येऊन पत्रकार परिषद घेतात. यांनी आधी काम पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे, असंही यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.