पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे सज्ज, अमित शाहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश?
1 ते 5 सप्टेंबर या काळात उदयनराजे (Udayanraje Bhosale BJP) मुंबईमध्ये भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत उदयनराजेंचा पक्षप्रवेश होऊ शकतो. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभेसोबतच घ्यावी, अशी उदयनराजेंची इच्छा आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेपूर्वी सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हमखास निवडून येणारा खासदार म्हणून ओळख असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale BJP) यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे. 1 ते 5 सप्टेंबर या काळात उदयनराजे (Udayanraje Bhosale BJP) मुंबईमध्ये भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत उदयनराजेंचा पक्षप्रवेश होऊ शकतो. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभेसोबतच घ्यावी, अशी उदयनराजेंची इच्छा आहे.
उदयनराजे यांची नेहमीच भाजपशी जवळीक राहिली आहे. शिवसेना आणि भाजपच्या यापूर्वीच्या युती सरकारमध्ये उदयनराजे राज्यमंत्रीही होते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि उदयनराजे यांची जवळीक महाराष्ट्राला माहित आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे राष्ट्रवादीपासून दुरावल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे साताऱ्यात राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडेही उदयनराजेंनी पाठ फिरवली होती.
रणजित निंबाळकरांची सूचक प्रतिक्रिया
माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि उदयनराजे यांची मैत्री जगजाहीर आहे. उदयनराजे आणि मी कायम सोबतच आहोत, अशी सूचक प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वीच निंबाळकरांनी दिली होती. पण ते भाजपात आल्यास त्यांचं स्वागत आहे, असंही निंबाळकरांनी आता म्हटलंय.
अमित शाह 1 सप्टेंबरला सोलापुरात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप 1 सप्टेंबरला सोलापुरात होत आहे. या कार्यक्रमासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातही काही नेत्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे.