मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष हा केवळ राज्यापुरता राहिला नाही तर अवघ्या देशात चर्चिला जातोय. शिवसेनेत उभी फूक पडल्यानंतर ज्या पद्धतीने भाजपने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटासोबत सरकार स्थापन केलं, याचे शिल्पकार कोण होते, यावरून अनेक दावे केले जातात. महाराष्ट्रातला भाजपचा करिश्माई नेता म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचंही नाव अनेकदा चर्चेत येतं. सत्तेच्या या चढाओढीत सर्वाधिक झळ बसलेला पक्ष आणि नेता म्हणजे उद्धव ठाकरे. 2019 निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा परस्परांवर गंभीर आरोप केले. एरवी वेगवेगळ्या व्यासपीठांवरून एकमेकांवर आगपाखड करणारे हे नेते एखाद्या ठिकाणी एकत्र दिसले तर? नुकतंच हे दृश्य दिसलंय. तेदेखील विधानभवन परिसरात…
विधानभवनात येत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकाच वेळी प्रवेश झाला. विधान भवनाच्या पायऱ्यांपासून भवनात प्रवेश करेपर्यंत ह दोघे सोबत होते. विशेष म्हणजे पायऱ्यांपाशी काही सेकंद या दोघांमध्ये संवाददेखील झाला. सत्तासंघर्षानंतर हे दोन नेते प्रथमच एकत्र दिसल्याने विधानभवन परिसरातील प्रत्येक व्यक्ती अक्षरशः थांबून हे दृश्य पहात होते. दोन नेत्यांमध्ये नेमका काय संवाद झाला, हे अद्याप समोर आलेलं नसलं तरीही दोघांच्या चेहऱ्यावरील हाव-भाव यावरून राजकीय चर्चांना उधाण आलंय.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार पाडण्यापासून शिंदे-भाजप सरकार स्थापन होईपर्यंत शिवसेना आणि भाजपमध्ये अभूतपूर्व शत्रूत्व निर्माण झालंय. राजकारणातील स्पर्धा एवढ्या थराला गेलेली अद्याप पाहिली नव्हती, असे जुने जाणकारही आवर्जून सांगतायत. पण आजचं विधानभवनातलं दृश्य नव्याने चर्चेत आहे. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियात फिरतोय. आवर्जून शेअर केला जातोय. ठाकरे आणि फडणवीस हे दोन नेते बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही आरोप प्रत्यारोप किंवा राजकीय द्वेषाचे भाव नव्हते. त्यामुळे या दोन पक्षांतलं वैर संपुष्टात येऊ शकतं की काय, अशा चर्चा रंगू लागल्यात. राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, असं म्हणतात, त्याचेच हे संकेत आहेत का, असं बोललं जातंय. नुकत्याच झालेल्या धुळवडीदरम्यान, फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आमचं कुणाशीही वैर नाही, असं स्पष्ट केलं होतं. मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी सगळं विसरून जाणं आता अशक्य असल्याची प्रतिक्रिया दिली होती.