आमच्या मागणीचा विचार केला आभार, आता लसीचा पुरवठा वेळच्यावेळी होईल अशी अपेक्षा : उद्धव ठाकरे
केंद्र सरकारने देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय जाहीर केल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
मुंबई : केंद्र सरकारने देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय जाहीर केल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच आता या लसीकरणासाठी पुरेपुर नियोजन करुन पुढील काळात राज्यात लसींचा पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहिल अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलीय (Uddhav Thackeray and Rajesh Tope on decision of Vaccination above 18 in India by Modi Government).
उद्धव ठाकरे म्हणाले, “काही दिवसांपूर्वीच मी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असल्याचं सांगितलं. तसेच तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलले आणि 18 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करत आपल्या मागणीचा विचार केला. त्यासाठी पंतप्रधान मोदी आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे मी मनापासून आभार मानतो. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल. यासाठी लसीचा पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षा.”
आज केंद्र शासनाने १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 19, 2021
18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची मागणी मान्य केल्याबद्दल आभार : राजेश टोपे
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील देशभरात 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण करण्याच्या निर्णयाचं स्वागत करत आभार मानले आहेत. “याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमवेत झालेल्या विविध बैठकांमध्ये सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन हा निर्णय घेतला त्याबद्दल आभार,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांच लसीकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचे राज्य शासनाच्या वतीने मन:पूर्वक स्वागत करतो.मी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमवेत झालेल्या विविध बैठकांमध्ये सातत्याने मागणी करत होतो त्याची दखल घेऊन हा निर्णय घेतल्याबद्दल
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 19, 2021
महाराष्ट्राने केलेल्या मागणीची दखल घेऊन केंद्र सरकारचा निर्णय
राजेश टोपे म्हणाले, “देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिक कामाच्या निमित्ताने सतत घराबाहेर असतात. त्यामुळे बाधितांमध्ये या वयोगटातील रुग्णांची संख्या देखील जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर या वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण करावे, अशी मागणी सातत्याने केंद्र शासनाकडे केली होती. राज्याने केलेल्या या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला आहे.”
“युवा वर्गाने आता लसीकरणात सक्रीय सहभाग नोंदवावा”
“राज्यात 18 ते 44 वयोगटातील लोकसंख्या अंदाजे 50 टक्क्यांपर्यंत आहे. युवा वर्गाने आता लसीकरणात सक्रीय सहभाग नोंदवून लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून कोरोनाला रोखणे शक्य होईल. राज्यात लसीकरणाला गती देतानाच दररोज 8 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
केंद्र सरकारचा मास्टर प्लॅन काय?
- स्थानिक कोरोना लसीची गरज पाहून निर्णय घेण्यासाठी लस उत्पादक आणि राज्य सरकारांना अधिकार.
- 18 वर्षावरील प्रत्येक भारतीय नागरिक लसीकरण घेण्यास पात्र असणार.
- लस उत्पादकांना लस उत्पादनात वाढ करण्यासाठी नव्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उत्पादक कंपन्यांना यात सहभागी करुन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार.
- लस उत्पादकांना त्यांच्याकडील 50 टक्के लस साठा राज्य सरकारला देण्याची परवानगी देण्यात आलीय. याशिवाय पूर्वनियोजित किमतीनुसार या कोरोना लस खुल्या बाजारात देखील उपलब्ध करुन देऊ शकणार.
- राज्य सरकारांना थेट कोरोना लस उत्पादक कंपन्यांकडून अतिरिक्त कोरोना लसी मिळवण्याबाबत आणि 18 वर्षांवरील कोणत्याही नागरिकाला लसीकरण देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार.
- याशिवाय सरकारच्यावतीने वयाच्या प्राधान्यक्रमानुसार नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याचाही कार्यक्रम सुरुच राहणार.
हेही वाचा :
मोठी बातमी, 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार
लसीकरणाचा वेग वाढवा; मनमोहन सिंगांचे मोदी सरकारला 5 सल्ले
व्हिडीओ पाहा :