खरोखरच हिंदुत्व सोडलंय का?; उद्धव ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीस यांना उत्तर काय?
काल आपली विजयी सभा झाली. आज केवळ मी तुमचं दर्शन घ्यायला आलो आहे. एका जिद्दीने ईशान्य मुंबई मागून घेतली आहे. गद्दारांच्या पालख्या किती काळ वाहायच्या? हरामखोरांच्या पालख्या किती काळ वाहायच्या? आजपर्यंत ज्यांना ज्यांना पालखीत बसवून मिरवलं ते दिल्लीला गेले. पण शिवसेनेवर घात केला. शिवसेना संपवायला निघाले. म्हणून त्यांना राजकारणातून संपवावच लागेल, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आहे. इंडिया आघाडीच्या सभेपासून त्यांनी त्यांच्या भाषणातील हिंदू हा शब्द वगळला आहे. त्यामुळे त्यांचं हिंदुत्वाशी काहीच नातं राहिलं नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांच्या या दाव्याला उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मी हिंदुत्व सोडलेलंच नाही. मी फक्त भाजपला सोडलं आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे हे विक्रोळीत आले होते. त्यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
मी हिंदुत्व सोडलं नाही,. मी भाजपला सोडलं. देशाची लढाई असल्याने मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवांनों अशी करतो. मी देशभक्त बांधवांनों म्हटलेलं चालत नाही का? तुमचा देशभक्त या शब्दावर आक्षेप आहे काय? ज्या कुणाला देशभक्त शब्दावर आक्षेप असेल… मग ते देवेंद्र फडणवीस का असेना, ते देशद्रोही आहेत. अशा लोकांना गेट आऊटच केलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.
मोदी भरकटले…
काल मोदी येऊन गेले. ते भरकटले आहेत. त्यांच्या मेंदूला क्षीण आला आहे. वाटेल ते बोलत आहेत. भ्रमिष्टांसारखं बोलत आहे. मला नकली संतान म्हणत आहेत. आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत आहेत. काल तर त्यांनी कहर केला. ते काँग्रेसच्या जाहीरनाम्याला माओवादी जाहीरनामा म्हणाले. तुमचा जाहीरनामा खाऊवादी आहे. आमचं सरकार आल्यावर मुंबई आणि महाराष्ट्राच्या लुटारूंना तडीपार करणार आहोत. सुरतेचे दोन जण महाराष्ट्र लुटत आहेत. इधर से उधर से असे लोक मुसलमानांची भीती दाखवत आहेत. इधर से उधर से भाडे से आलेले लोक ही भीती दाखवत आहेत. तुम्ही या इधर से उधर से अशा भाडोत्रींना सोबत घेतलं, त्यांच्यामुळे उत्तर भारतीय आणि जैनांचं काय होणार आहे?, असा सवाल त्यांनी केला.
शाह, मोदी, अदानीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही
गुजरात पाकिस्तानात आहेत का? असा जाब तुम्ही आम्हाला विचारता. अहो, फडणवीस गुजरात हे आमच्या देशातीलच राज्य आहे. पण महाराष्ट्राचं ओरबाडून तिकडे नेत आहात ना, त्याला आमचा विरोध आहे. माझा महाराष्ट्र शाहू, फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तो काय आफगाणिस्तानात आहे काय? मी शाहू फुले आणि आंबेडकरांचा हा महाराष्ट्र शाह, मोदी आणि अदानीची होऊ देणार नाही. जे मस्तीत वागतील त्यांची मस्ती कशी जिरवायची हे आमच्या मर्द शिवसैनिकांना माहीत आहे, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.