संभाजी भिडेंनी कोणत्या बागेतील आंबा खाल्ला माहीत नाही; उद्धव ठाकरेंचा टोला
रायगड किल्ल्यावरील ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या "वाघ्या कुत्र्याच्या" समाधीबाबत वाद निर्माण झाला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी तिचे निराकरण करण्याची मागणी केली आहे तर संभाजी भिडे यांनी याला पाठिंबा दिला आहे.

ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरुन हटवावी, अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकारणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली. याबद्दलचे पत्र संभाजीराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. या मागणीला शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी विरोध केला होता. संभाजीराजे भोसले बोलतात ते १०० टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्या बाबत मी वाचलं आहे आणि ती कथा सत्य आहे, असे संभाजी भिडे म्हणाले. आता यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी जबरदस्त टोला लगावला आहे.
संभाजी भिडे काय म्हणाले होते?
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभावी होते का, या प्रश्नावर संभाजी भिडे गुरूजींनी उत्तर दिले, ते नव्हते, आम्ही चिकटवलंय, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते. शहाजीराजे असे बोलले होते की, मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे. स्वतंत्र राज्य निर्माण करायचं आहे. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघल, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज,सिद्धी हाप्शी, या सर्व परकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकलायं. हिंदूची संस्कृती रक्षणासाठी मला हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे. याचे पुस्तकात पुरावे आहेत. आत्ताचे व्याख्याते आपल्या वक्तव्यातून महाराजांचा उपयोग आपल्या आपल्या सोयीसाठी वापरतात, असे संभाजी भिडे म्हणाले.
संभाजीराजे भोसले बोलतात ते १०० टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत मी वाचलं आहे आणि ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे. त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात, तेवढी कुत्री असतात, निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे,याचे द्योतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे, असेही संभाजी भिडेंनी म्हटलं होतं.
उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काय?
आता नुकतंच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना संभाजी भिडेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी जोरदार टोला लगावला. त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही. त्यामुळे त्यांच्या बद्दल बोलायचं नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
संभाजी भिडे आंब्यावरुन काय म्हणाले होते?
दरम्यान काही वर्षांपूर्वी संभाजी भिडे यांनी माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यास जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असा अजब दावा केला होता. “भगवंताची कृपा आहे ही मला एक कोय मिळाली. त्या कोईचं रोपटं करुन आता त्याचं झाडं झालं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे.”, असे संभाजी भिडे म्हणाले होते.