प्रदिप कापसे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : राज्यात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी (Court Hearing) आता नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) राज्यातील सरकारबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र राज्यपाल यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर 1 तारखेला सुनावणी होण्याची शक्यता असून पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर 01 नोव्हेंबर ही तारीख टेंटेटीव्ह म्हणून दाखवण्यात आली आहे. राज्यपालांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होणार असल्याने राज्यातील सत्तासंघर्षाचे काय ? अशी चर्चा सुरू झाली असून 01 नोव्हेंबरच्या दिवशी काय निकाल लागतो याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे गट आणि भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली होती.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले असून त्याबाबतचा वाद सुप्रीम कोर्टात जाऊन पोहचला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाच्या सुभाष देसाई यांनी राज्यपाल यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या निलंबनाच्या मुद्दयासह 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना सुरू झाला होता.
विधानसभा अध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने राज्यपाल यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत थेट कोर्टात याचिका दाखल केली होती.
त्यामुळे बेकायदेशीर सरकार आल्याची टीका करत उद्धव ठाकरे यांच्या वतीने न्यायालयात धाव घेण्यात आली होती.