संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर, शिंदे गटाच्या विरोधात संजय राऊत यांचा प्लॅन काय?
आत्तापर्यन्त शिवसेना ठाकरे गटातील संपर्कप्रमुख पदावर असलेले भाऊसाहेब चौधरी यांच्यासह मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह 12 हून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) हे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिवसेना प्रमुख ( Nashik Shivsena ) पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संजय राऊत संवाद साधणार आहे. याच दरम्यान संजय राऊत यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. त्याचे कारण म्हणजे संजय राऊत ज्या वेळेला नाशिक दौऱ्यावर येतात त्याच वेळेला दुसऱ्याच दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे शिंदे गटात जाऊन सामील होतात.
एकूणच संजय राऊत यांचा नाशिक दौरा ठरलेला असतानाच दुसरीकडे शिंदे गटाचे पदाधिकारी एक चाल खेळतात आणि संजय राऊत यांना मोठा धक्का देत असतात. आत्ताच्या दौऱ्या दरम्यान काय घडणार अशी चर्चा नाशिकमध्ये सुरू झाली आहे.
तर यावेळी संजय राऊत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी काय संवाद साधतात. कार्यकर्त्यांना काय सूचना देतात याबरोबरच संजय राऊत शिंदे गटालाच धक्का देतात की आहे ते शिवसैनिक रोखून धरतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
संजय राऊत सायंकाळी शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असल्याने संजय राऊत यांच्या भाषणात कुणावर टीकेचे बाण सोडले जातात हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.
यापूर्वी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आलेले असतांना शिंदे गटाने मोठी चाल खेळली आहे. ठाकरे मुंबईत पोहचत नाही तोच शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
आत्तापर्यन्त संजय राऊत यांच्या शिवसेना ठाकरे गटातील संपर्कप्रमुख पदावर असलेले भाऊसाहेब चौधरी यांच्यासह मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी नगरसेवक प्रवीण तिदमे, सूर्यकांत लवटे, राजू लवटे यांच्यासह 12 हून अधिक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
तर ग्रामीण भागातील पन्नासहून अधिक शिवसैनिकांनी शिंदे गटात हिवाळी अधिवेषनाच्या दरम्यान प्रवेश केला आहे. अशा तिन्ही वेळेस संजय राऊत यांचा दौरा संपताच शिंदे गटाने चाल खेळली असून ठाकरे गटाला धक्का दिला आहे.
यावेळी मात्र खासदार संजय राऊत शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती रोखणार की पुन्हा शिंदे गट धक्का देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या या दौऱ्याकडे नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.