उद्धव ठाकरे यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाला दिला धक्का
कर्मवीर भाऊसाहेब हीरे यांच्या चौथ्या पिढीचे वारसदार असलेले डॉ. अद्वय हिरे दादा भुसे यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत टक्कर देणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
नाशिक : कधीकाळी ठाकरे घरण्याशी एकनिष्ठ असलेले मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांनी ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहे. त्यामुळे शिंदे गटात मंत्री असलेल्या आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाची माळही गळ्यात असलेल्या दादा भुसे यांनाच उद्धव ठाकरे यांनी धक्का दिला आहे. यामध्ये दादा भुसे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार कोण असणार अशी चर्चा असतांना उद्धव ठाकरे यांनी मोठी खेळी खेळली आहे. भाजपमध्ये असलेले डॉ. अद्वय हिरे यांनाच पक्षात प्रवेश दिला जाणार आहे. 27 जानेवारीला हा मुंबईत मातोश्री येथे हा पक्षप्रवेश होणार आहे. डॉ.अद्वय हिरे यांच्यासोबत मालेगावमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील प्रवेश करणार आहे. दादा भुसे यांना धक्का देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी खेळलेली चाल बघता दादा भुसे यांचे टेन्शन वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी विचार सभा घेऊन डॉ.अद्वय हिरे यांनी भाजप सोडत असल्याचे जाहीर केले होते त्यानंतर त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती.
कर्मवीर भाऊसाहेब हीरे यांच्या चौथ्या पिढीचे वारसदार असलेले डॉ. अद्वय हिरे दादा भुसे यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत टक्कर देणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
मालेगावमध्ये हिरे घराण्याला राजकारणातून अक्षरशः चारी मुंड्या चीत करणारे दादा भुसे यांनाच निवडणुकीच्या आखाड्यात चितपट करण्यासाठी हिरे कुटुंब आता तयारीला लागले आहे.
मालेगावमध्ये दादा भुसे यांच्या विरोधात हिरे कुटुंब फारसे सक्रिय नव्हते, मात्र आता भुसे यांचं शिंदे गटात जाणं ही संधी शोधून आणि भुसे यांच्याबद्दल मालेगावमध्ये असलेली नाराजी आणि शिवसेना फूटीचा फायदा हिरे यांना होणार असल्याचे बोललं जात आहे.
हिरे कुटुंबाचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठा वाटा राहिला आहे, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात हिरे कुटुंबाचे मोठं प्रस्थ आहे, त्यामुळे अद्वय हिरे यांच्या निमित्ताने ठाकरे यांनाही भुसे यांना टक्कर देण्यासाठी तुल्यबळ उमेदवार मिळाला आहे.
27 जानेवारीला मातोश्री येथे शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांच्या उपस्थित अद्वय हिरे यांचा प्रवेश होणार आहे, हिरे यांच्या प्रवेशाची मालेगावसह नाशिकमध्ये जोरदार तयारी सुरू आहे.