तर 2024 ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असू शकते; उद्धव ठाकरे यांचा इशारा
बाळासाहेब आणि माँच्या पोटी मी जन्माला आलो हे भाग्य आहे. ते भाग्य त्यांना मिळणार नाही. दिल्लीवाले त्यांना ते भाग्य देऊ शकत नाही. ते कितीही उतले मातले तरी करू शकत नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.
मुंबई : चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू झाला आहे. तरीही तुम्ही माझ्याकडे आला आहात. तुम्ही का आला ते सांगा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो असं म्हणत पत्रकार परिषदेला सुरुवात करताच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपला ( BJP ) डिवचलं आहे. एकच गोष्ट सांगेन. त्यांनी पक्षाचं नाव आणि चिन्हं जरी चोरलं असलं तरी हा पूर्वनियोजित कट होता आणि आहे असा खळबळजनक दावाही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी शिवसेना नाव चोरलं तरी ठाकरे हे नाव नाही चोरू शकत नाही असंही उद्धव ठाकरे यांनी सुनावलं आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, बाळासाहेब आणि माँच्या पोटी मी जन्माला आलो हे भाग्य आहे. ते भाग्य त्यांना मिळणार नाही. दिल्लीवाले त्यांना ते भाग्य देऊ शकत नाही. ते कितीही उतले मातले तरी करू शकत नाही.
देशातील कोणत्याही पक्षावर ते ही परिस्थिती आणू शकतात. आताच ही परिस्थिती रोखली नाही तर देशात कदाचित 2024 ची निवडणूक शेवटची असेल. हुकूमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो असे मतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत हा गंभीर आरोप केला आहे. 2024 ला लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यावरून भारतीय जतना पार्टीवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.
नुकताच निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरुन उद्धव ठाकरे यांनी हा एक कट असल्याचे म्हंटले आहे. खरंतर निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्याने उद्धव ठाकरे यांनी मागणी केली होती.
त्या आधीच केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. त्यात शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिल्याने उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल करत भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
देश हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा आरोप करत 2024 च्या निवडणुका होणार नाहीत असेही उद्धव ठाकरे यांनी म्हणत शिंदे गटावर चोर म्हणत हल्लाबोल केला आहे. एकूणच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावरून उद्धव ठाकरे हे अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून देशात 2024 ला हुकूमशाही येईल अशा स्वरूपाचे मतचं उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.