विधानसभा निवडणूक कशी जिंकायची?; उद्धव ठाकरेंनी मेगा प्लॅन सांगितला
Uddhav Thackeray on Vidhansabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणूक कशी जिंकायची? यावर उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्याचं प्लॅनिंग सांगितलं आहे. वाचा सविस्तर...
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्याचं लक्ष आहे ते विधानसभा निवडणुकीकडे… याच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जिंकण्याचा मेगा प्लॅन सांगितला आहे. पुण्यातून वंचितच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढलेल्या वसंत मोरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. तेव्हा आगामी निवडणुकीला घेऊन शिवसेना ठाकरे गटाचा काय प्लॅन आहे? ते उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलं. वसंतराव मोरे आणि तुमचे सहकारी शिवसैनिकांचं स्वगृही परतल्याबद्दल मी स्वागत करतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली.
पुण्यात शिवसेना वाढली पाहिजे- ठाकरे
शिवसेनेत प्रवेश करताना काहीजण म्हणाले की आम्ही आधी शिवसैनिक होतो. तर तुम्ही मधल्या काळात जर शिवसेना सोडली तर तुम्हाला शिक्षा तर झाली पाहिजे. वसंतरावांना पण शिक्षा झाली पाहिजे. ती शिक्षा अशी आहे की, पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने मला शिवसेना वाढवून पाहिजे. ती वाढवण्याची जबाबदारी तुमची… ही तुमची शिक्षा असेल. शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे. त्याला तसं घेऊ नका. ही जबाबदारी म्हणून घ्या. पण पुण्यात आपल्याला शिवसेना वाढवायची आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे.पुणे क्रांतीकारकांचं शहर आहे. पुणे हे महाराष्ट्रातील सत्ताबदलाचं केंद्र असलं पाहिजे. पुण्यात आता मला शिवसैनिकांचा मेळावा घ्यायचा आहे. तेव्हा सगळे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांना बोलवा. सगळ्यांशी मला संवाद साधायचा आहे. तुम्हा सगळ्याना पुण्यात काम करण्यासाठी शुभेच्छा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
वसंत मोरेंचं स्वागत
लोकसभा निवडणुकीआधी सगळ्यांचं लक्ष होतं की वसंतराव नेमकं करतायेत काय? काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण एका गोष्टीचं मला समाधान आहे की तुम्ही आधी शिवसैनिक होता. मधल्या काळात तुम्ही वेगळ्या पक्षात कशी वागणूक मिळते ते पाहिलंत. सन्मान मिळतो का ते तुम्ही पाहिलंत. तो अनुभव घेऊन तुम्ही पुन्हा शिवसेनेत आला आहात. त्यामुळे तुमची जबाबदारी अधिक वाढवी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.