‘ठाकरे सोबत असते तर आज…’, भाजपच्या बड्या नेत्याकडून उद्धव ठाकरेंचं तोंडभरून कौतुक
येत्या पाच डिसेंबरला गुरुवारी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र अजूनही नवा मुख्यमंत्री कोण? याबाबत सस्पेन्स कायम आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे.
येत्या पाच डिसेंबरला गुरुवारी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र अजूनही नवा मुख्यमंत्री कोण? याबाबत सस्पेन्स कायम आहे. महायुतीकडून अजून कोणाच्याही नावाची घोषणा करण्यात आलेली नाही, या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तसेच यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले दानवे?
पाच तारखेला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे, आधी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, नेता निवडला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. जसं ठरलं तसं सुरू आहे, कोणताही वाद आमच्यामध्ये नाही. मुख्यमंत्रिपद कोणाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे, मात्र मुख्यमंत्री कोण हे आमचं ठरलं आहे. मात्र जोपर्यंत वरिष्ठांची सही होत नाही, तोवर अधिकृतरित्या नाव जाहीर केलं जात नाही, असा आमच्या पार्टीचा विषय आहे. जोवर वरिष्ठांचा शिक्का बसत नाही, तोवर मुख्यमंत्रिपदी कोण? याबाबत कुठलीही घोषणा होणार नाही असं दानवे यांनी म्हटलं आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, सगळं ठरल्याप्रमाणेच होणार आहे, प्रसंग, वेळ पाहून आम्ही सगळं करत असतो. वेळही ठरवली आहे, तारीखही ठरवली आहे. जो कोणी आमचा नेता निवडला जाईल तो आमचा मुख्यमंत्री असेल. सगळं ठरलं आहे बॉसचा शिक्का झाला की सगळं समजेल.
दरम्यान यावेळी बोलताना दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जर तेव्हा शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली नसती तर 2014 ते 2019 या काळात जसं सरकार चालवलं गेलं तसंच ते आताही सुरू असतं, या कारभाराच्या जोरावर आम्हाला याहून देखील अधिक जागा मिळाल्या असत्या. उद्धव ठाकरे सोबत असते तर आज जेवढं बहुमत मिळाले आहे, त्यापेक्षा जास्त बहुमत आम्हाला मिळालं असतं, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे, यावर देखील रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचं वृत्त त्यांनी फेटाळून लावलं आहे. शिंदे बिलकुल नाराज नाहीत, केवळ वर्तमानपत्र आणि चॅनलला चाललेली ही बातमी आहे. ते स्वतःच्या गावी गेले आहेत, यात शंका उपस्थित करण्याचा प्रश्न नाही, असं दानवे यांनी म्हटलं आहे.