फडतूणवीस… उद्धव ठाकरे यांची फडणवीसांवर खोचक टीका; पोलिसांनाही जाहीर इशारा
तुमच्या ताकदीमुळेच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भीती वाटत आहे. मोदी पूर्वी सारखं म्हणायचे की, मै अकेला सब पे भारी... आता म्हणत आहेत, मै अकेला बेचारा. मोदीजी, तुम्ही विश्वगुरू आहात. तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती का वाटत आहे? असा टोलाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूणवीस असं संबोधत त्यांचा उद्धार केला आहे. शाखा भेटीच्या कार्यक्रमांतर्गत त्यांनी विक्रोळीतील सभेला संबोधित करताना फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी पोलिसांनाही जाहीर इशारा दिला. आमच्या शिवसैनिकांवर आणि महिलांवर हात उचलणाऱ्या पोलिसांचं काय करायचं हे मी सत्ता आल्यावर पाहून घेणार आहे. माझ्याकडे फक्त त्यांची नावे द्या, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
पाचव्या टप्प्यातील प्रचार आज संपत आहे. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे हे आज शाखांना भेटी देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये आले होते. यावेळी एक छोटेखानी सभाही झाली. या सभेला संबोधित करताना त्यांनी फडणवीस यांचा फडतूणवीस असं संबोधत उद्धार केला. काल शिवसैनिकांनी या मतदारसंघात धाड टाकली. त्यात आपल्याच महिला आणि शिवसैनिकांना पकडलं आणि बेदम मारहाण करण्यात आली. मला त्या पोलिसांची नावे पाहिजे. बघतो मी पुढे काय करायचं ते. पोलिसांनाही सांगतोय की तुम्ही, भाजपचे की किंवा फडतूणवीसचे… नाही… फडणवीसांचे नोकर नाही आहात. तुम्ही जनतेचे सेवक आहात. मित्र आहात, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.
हे सरकार जाणार आहे. उद्या आमचं सरकार आल्यावर तुमचं काय करायचं याचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. हा पोलिसांना मी जाहीर इशारा देत आहे. कोणी असू द्या. लोकशाही आणि जनतेसमोर तुमची मस्ती खपवून घेणार नाही. महिलांवर नेभळट हात उगारलाय. त्या हाताचं काय करायचं हे उद्या सरकार आल्यावर पाहून घेतो, हा इशारा मी पोलिसांना देत आहे, असंउद्धव ठाकरे म्हणाले.
म्हणून गायकवाडने गोळीबार केला
गणपत गायकवाडने फडतूणवीस… फडतूस काय शब्द… माझी जीभ अडकतेय.. फडतूणवीस… फडणवीस.. तुम्ही टाळ्या वाजवू नका. मला करेक्ट करा… फडतूणवीस… फडणवीस यांच्याकडे गणपत गायकवाड यांनी तक्रार केली होती. पण त्यांचं ऐकलं नाही. त्यामुळे त्यांनी गोळीबार केला. ज्यांच्यावर गोळीबार झाला अशा लोकांना घेऊन मोदी फिरत आहेत. हे लाजीरवाणं चित्र देशात कुठेच नसेल. ते महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे, असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढवला.