प्रकाशजी, भविष्यात आपलं जमणार नाही अशी… उद्धव ठाकरे यांचं आंबेडकरांना आवाहन काय ?
हातकणंगले हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. मागच्यावेळी राजू शेट्टी यांचा पराभव आम्ही केला होता. आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. पण तिथल्या लोकांचं म्हणणं होतं की शिवसेनेच्या मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार असावा. मशालीवर लढावा. आम्ही राजू शेट्टींना विनंती केली की, तुमचा पक्ष रितसर आघाडीत येऊ द्या. तुम्ही मशालीवर लढा. पण त्यांनी मशालीवर लढण्यास नकार दिला, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
आज आपलं जमलं नसेल, पण प्रकाशजी, भविष्यात आपलं जमणारच नाही, अशी भूमिका घेऊ नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबतची युती तोडली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील कुणालाही शिवसेनेत घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच राजू शेट्टी हे मशाल चिन्हावर लढण्यास तयार नव्हते म्हणून आम्ही हातकणंगलेमधून उमेदवार दिला आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांनी बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला. नागपूरमध्ये त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. आंबेडकर यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आमच्या दोघांच्या आजोबांचं ऋणानुबंध होतं. आपण हुकूमशाहीविरुद्ध एकत्र आलो होतो. आज आपलं जमलं नसेल पण भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका. काही वेळा काही गोष्टी होत नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यांच्याविरोधात बोलणार नाही
प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यात तथ्य नव्हतं. आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिलं असतं. पण आम्ही त्यांच्याविरोधात काही बोललो नाही. बोलणार नाही. त्यांनी माझ्यावर कितीही टीका केली तरी मी त्यांच्याविरोधात बोलणार नाही. त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे. ते काहीही बोलले तरी मी त्यांच्याविरोधात बोलणार नाही. कारण आमच्या दोघांचे आजोबा समाजसुधारणेसाठी एकत्र आले होते. संविधान धोक्यात आले असताना आपण एकत्र येऊन आपली ताकद दाखवायला हवी होती. हरकत नाही. माझ्या लोकांना सांगितलंय त्यांच्याविरोधात बोलू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
म्हणून हातकणंगले लढतोय
राजू शेट्टी यांच्यासोबतची बोलणी फिसकटण्याचा प्रश्नच नाही. हुकूमशाही गाडायची असेल तर विरोधकांची ताकद वाढली पाहिजे म्हणून कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. त्यामुळे शाहू महाराजांचा मान म्हणून कोल्हापूरची जागा आम्ही काँग्रेसला दिली. दुसरी जागा सोडली असती तर हिंदुत्ववादी मतदार नाराज झाला असता. त्यामुळे आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतला, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
दोन जागा मित्र पक्षांनी लढाव्या
सांगलीची जागा जाहीर होऊन दहा दिवस झाले आहेत. संजय राऊत तिथे प्रचाराला जाणार आहेत. आमची प्रचाराची सुरुवात झाली आहे. मुंबईतील दोन जागा आहेत. मुंबईतील उरलेल्या दोन जागांवर मित्र पक्षांनी लढावं ही आमची इच्छा आहे. त्यांचे उमेदवार जाहीर होताच आमचे शिवसैनिक त्यांच्या प्रचारात जातील. त्याबाबत कार्यकर्ते विचारत आहेत. मित्र पक्ष लढवतोय की नाही? लढवत असेल तर कोण लढवतोय? ते कळावं. म्हणजे आम्हाला प्रचार करायला मिळेल. काँग्रेसनेही वेळ घालवू नये. जागा वाटप झालं आहे. मैत्रीपूर्ण लढत अशा लढाईला अर्थ नाही. मैत्री असते तेव्हा लढत नसते, असंही त्यांनी सांगितलं.