उद्धव ठाकरे यांची ‘पोटदुखी’ आणि डॉक्टर एकनाथ शिंदे यांची नवी घोषणा, ‘डॉक्टर येणार दारी’
ब्रिटनचे पंतप्रधान यांना भेटलो, तर टीका सुरू झाली. मी काय बोललो, कसं बोललो, यावर चर्चा सुरू झाली. मला बोलायला लावू नका, नाहीतर तुम्हाला काढा प्यायची वेळ येईल,
जळगाव : 12 सप्टेंबर 2023 | अजितदादा पवार यांनी विकासाला पाठिंबा दिला. राज्य सरकारसोबत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आपल्याला नेहमी सहकार्य असते. मागचे अडीच वर्षे सरकार थांबले होते. ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून सरकार गतिमान केले. राज्यात अनेक प्रकल्प सुरू केले. हा कार्यक्रम पाहून अनेक लोकांना पोटदुखी होत आहे. यावर उपाय म्हणून लवकरच ‘डॉक्टर आपल्या दारी’ सुरू करणार आहोत. हा पब्लिसिटी करण्याचा प्रयत्न नाही. तुम्ही घरी बसला आणि आम्ही लोकांच्या दारी आलोय, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पहिल्या तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे उपस्थित होते.
अहिराणी बोलीतून भाषणाला सुरुवात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरवात अहिराणी भाषेतून केली. महिलांना ५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना दिली. पीक विमा योजनेत एक रुपया भरून बाकी सर्व पैसे सरकार भरणार आहे. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला अभिमान आहे आणि अडचणी यांची देखील जाण आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
काढा प्यायची वेळ येईल.
दिल्लीत G-20 परिषद सुरू आहे. जगभरातले 20 देशांचे प्रमुख तिथे आले. त्यांचे मोदी यांच्यासोबत bonding पाहिले का? तिथल्या ठरावाला मान्यता मिळाली. खऱ्या अर्थाने आज देश महासत्ता होत आहे. मग काही जणांना पोटदुखी का होत आहे? सरकार गेल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान यांना भेटलो, तर टीका सुरू झाली. मी काय बोललो, कसं बोललो, यावर चर्चा सुरू झाली. मला बोलायला लावू नका, नाहीतर तुम्हाला काढा प्यायची वेळ येईल, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
टीका करून प्रश्न सुटत नाही – अजित पवार
दोन चार दिवसांत बरा पाऊस झाल्याने चांगली परिस्थिती दिसत आहे. मात्र, सगळीकडे अशी परिस्थिती नाही. काही ठिकाणी पाऊस दुरावला आहे. जळगाव जिल्ह्यात आणखी पावसाची गरज आहे. हा जिल्हा सुवर्ण नगरी म्हणून ओळखला जाणारा आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.
निव्वळ लोकांची कामे करण्यासाठी मी महायुती सरकारमध्ये गेलो. मोदी साहेब विकासाचे व्हिजन असणारे नेते आहे. केंद्र सरकारच्या मदतीने विकासाची गाडी भरधाव वेगाने जाण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. टीका टिप्पणी करून लोकांचे प्रश्न सुटत नाही. काही जण निव्वळ नौटंकी करतात असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
मार्ग काढायचा आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे. कालच यावर बैठक झाली. राज्यकारभार करत असताना सगळ्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढायचा असतो. सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, आपल्याला मार्ग काढायचा आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.