नाशिक : शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीनंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई, ठाणे वगळता उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार असून ठिकठिकाणी सभा घेणार आहेत. त्या सभेच्या माध्यमातून विविध जिल्ह्यातील आणि विभागातील निवडणुकीचे एक प्रकारे रणशिंग फुंकणार आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे विविध विभागांमध्ये जाऊन दौरे करत आहेत. त्यानुसार नुकताच संजय राऊत यांनी नाशिकमध्ये ( Nashik News ) दौरा केला आहे. नाशिक मधील एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आमदार तथा नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे ( Dada Bhuse ) यांच्या बालेकिल्ल्यातच ही सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून या सभेची जोरदार तयारी केली जात आहे.
दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. 26 मार्चला सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार असून नुकतेच शिवसेना ठाकरे गटामध्ये सहभागी झालेले अद्वय हिरे हे या सभेचे नियोजन करत आहेत.
नुकतीच या संदर्भामध्ये मालेगाव येथे बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये स्थळ आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे. मालेगाव येथील मसगा महाविद्यालय आणि पोलिस कवायत मैदानावर उद्धव ठाकरे यांची उत्तर महाराष्ट्राची सभा पार पडणार आहे.
उत्तर महाराष्ट्रा ची सभा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मालेगाव हे शहर निवडलेले आहे. एकूणच दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यात ही सभा होणार असून एकप्रकारे एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या विरोधात ही सभा होणार आहे.
याशिवाय बाजूलाच नांदगाव मतदारसंघ आहे. त्या नांदगाव मतदार संघाचे आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे दोन्ही आमदारांना इशारा देत असतानाच उद्धव ठाकरे एक प्रकारे आगामी काळातील निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.
याशिवाय निवडणूक काळात उमेदवार कोण असणार याबाबत देखील सूचक विधान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालेगाव येथील जाहीर सभा भव्यदिव्य करण्यासाठी अद्वय हिरे यांच्या कडून जोर लावला जातोय. त्यांच्यासोबतच जिल्ह्यातील अनेक बडे नेते उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी नियोजन करत आहेत.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राज्यभर दौरा होत असतांना मालेगाव येथील मेळावा आणि जाहीर सभा अधिक महत्वाची मानली जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदार, खासदार यांची संख्याही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.