पावसाचं सावट, वाहतुकीची कोंडी… मुंबईकरांनो दक्षिण मुंबईत येण्यापूर्वी ही बातमी वाचाच
मुंबईतील शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा आहे. यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
विधानसभेची निवडूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. आज विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण. आजच्या दिवशी राज्यभरात राजकीय मेळावे, सभा होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे आज संध्याकाळी मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादर येथे शिवाजी पार्कवर होणार आहे तर शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. संध्याकाळी या दोन्ह पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या तोपा धडाडणार असून निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
मुंबईतील शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा आहे. यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आजच्या मेळाव्यात काय बोलणार याची अनेकांना उत्सुकता आहे. मात्र या दोन्ही मेळाव्यांवर पावसाचं संकट घोंगावत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला आहे. आजही मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहून गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पाऊस आलाच तर या दोन्ही मेळाव्यांचं काय होईल, असा प्रश्नही लोकांच्या मनात आहे.
शिवाजी पार्कमध्ये चिखलाचं साम्राज्य
आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्याची पूर्वतयारी सध्या मैदानात सुरू असून भव्य असा स्टेज या मेळव्यासाठी उभारण्यात आला आहे. तसेच मोठ्या संखेने खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत. पण गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत पाऊस बरसत असल्यामुळे या मैदानात चिखलाचं साम्राज्य तयार झालं आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी या दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांना कसरत करावी लागणार आहे. पण आज या दसऱ्या मेळाव्यातून उद्धव ठाकरे विरोधकांवर काय हल्लाबोल करणार हे पाहणं महत्वच ठरणार आहे.
शिवसेना भवनातून शिवसैनिकांना आवाहन आणि मार्गदर्शक सूचना
या मेळाव्यानिमित्त शिवसेना भवनातून शिवसैनिकांना आवाहन आणि मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहन व अन्य नियोजन तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून करण्यात आले आहे. तसेच वाहतुकीची व्यवस्था कशी असेल, त्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवसैनिकांना सूचना
शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांची वाहने सी. रामचंद्र चौक व वसंत देसाई चौक या ठिकाणी सोडून त्यानंतर सदरची वाहने शिवाजी पार्क येथील कामगार क्रीडा भवन, वनिता समाज, संयुक्त महाराष्ट्र दालन, वीर सावरकर स्मारक येथे पार्किंग करण्याकरिता घेऊन जावीत. पश्चिम व उत्तर उपनगरातून येणाऱ्या मोठ्या वाहनांतून (उदा. बसेस, टेम्पो इ.) कार्यकत्यांना माहीम, शोभा हॉटेल येथे डावे वळण देऊन सेनापती बापट मार्गावरून बाळ गोविंददास मार्ग जंक्शनपर्यंत नेऊन वाहने पार्क करून सभेसाठी जावे. जीप अथवा कार एल. जे. रोडने राजा बडे चौकापर्यंत न्यावी व तेथे कार्यकर्ते उतरल्यानंतर सदर वाहने जे.के. सावंत मार्गावरील कोहिनूर वाहनतळ येथे पार्किगकरिता पाठवावीत.
पूर्व द्रुतगती महामार्गावरून येणारी मोठी वाहने (उदा. टेम्पो व बस इ.) दादर, खोदादाद सर्कल येथे उतरून फाइव्ह गार्डन, माटुंगा येथे पार्किंगकरिता पाठवावीत.
दक्षिण मुंबईतून येणारी वाहने (उदा. टेम्पो व बस इ.) ही डॉ. अॅनी बेझंट मार्गे स्वा. सावरकर मार्गावरून सूर्यवंशी क्षत्रीय सभागृह मार्गापर्यंत येतील व तेथे कार्यकर्ते उतरल्यानंतर ती सथानी रोडने सेनापती बापट मार्गावर पार्किंग करतील,
जेवणाचे डबे, बॅगा आणू नका
दसरा मेळाव्याकरिता येणाऱ्या शिवसेनाप्रेमी जनतेने व शिवसैनिकांनी जेवणाचे डबे, बॅगा अथवा अन्य वस्तू घेऊन येऊ नये, असे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव दिले आहेत. या निर्देशांचे पालन तंतोतंत करावे. तसेच शिवाजी पार्क मैदानात प्रवेशद्वारातून प्रवेश करताना पोलीस सुरक्षा तपासणी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.
वाहने उभी करण्याची व्यवस्था खालीलप्रमाणे :-
बसेस, टेम्पो ट्रॅव्हलर, मोठे टेम्पो – संपूर्ण सेनापती बापट मार्ग, दादर, कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग, दादर माहीम कॉजवे ते माहीम जंक्शन
फाईव्ह गार्डन, माटुंगा एडनवाला रोड, माटुंगा, नाथालाल पारेख, माटुंगा आर. ए. के. रोख, वडाळा
चारचाकी हलकी वाहने – इंडिया बुल इंटरनॅशनल सेंटर, सेनापती बापट मार्ग, दादर, इंडिया बुल्स १ सेंटर, ज्युपिटर मिल कंपाऊंड, एल्फिन्स्टन, सेनापती बापट मार्ग कोहिनूर पार्क, शिवाजी पार्क
आसन आणि वाहन व्यवस्था
वीर सावरकर मार्गावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांचे आमगन होईल. त्यामुळे इतर शिवसेनाप्रेमी जनतेने व शिवसैनिकांनी या मार्गावर वाहने घेऊन येऊ नयेत.
शिवसेना उपनेते, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, निमंत्रित यांच्या आसन व्यवस्थेकरिता कालिकामाता मंदिराच्या शेजारून तसेच स्काऊट पॅव्हेलियनच्या बाजूने प्रवेश देण्यात येईल. या परिसरात आसन संख्या मर्यादित असल्याने निमंत्रण पत्रिकेशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही.
शिवसेना नेते व व्यासपीठावरील मान्यवरांकरिता वीर सावरकर मार्गावरील उद्यान गणेश मंदिरापुढील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारून प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कॅमेरामन व वृत्तपत्र प्रतिनिधी यांना समर्थ व्यायाम मंदिराकडून प्रवेश देण्यात येईल. त्यांनी आपले ओळखपत्र दाखवून प्रवेश करावा व पोलिसांना सहकार्य करावे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या ओबी व्हॅन समर्थ व्यायाम मंदिर परिसरातच उभ्या कराव्यात.