भुयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा बीकेसीच्या कर्मचाऱ्यांना फायदा, रात्रीपर्यंत इतकी प्रवासी संख्या
भुयारी मेट्रो - 3 च्या प्रवाशांना लवकरच टनेलमध्येही मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सध्या मात्र मोबाईल नेटवर्क कनेक्टीव्हीटी तिकीट खिडक्या तसेच कॉन्कोर्सजवळ उपलब्ध आहे
मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो-3 चा पहिला टप्प्याचे लोकार्पण 5 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आज सोमवारपासून प्रवाशांसाठी प्रत्यक्षात भुयारी मेट्रो सुरु झाली. बीकेसी ते आरे जीव्हीएलआर या पहिल्या टप्प्याचा प्रवास आजपासून खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे. या मार्गावर एकूण दहा स्थानके आहेत. तसेच बीकेसीतील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पश्चिम उपनगरात जाण्यासाठी ही भुयारी मेट्रो – 3 खूपच फायदेशीर ठरली आहे. पहिल्या दिवशी भुयारी मेट्रोने 18,015 प्रवासी संख्या गाठली आहे.
मेट्रो-3 या मुंबईतल्या पहिल्या भुयारी मेट्रोतून सोमवारपासून मुंबईकरांचा प्रवास सुरु झाला आहे. बीकेसी ते आरे JVLR पर्यंत अखंड नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळाली असल्याने याचा फायदा बीकेसीत कार्यालयं असणाऱ्यांना झाला आहे. बीकेसीतून पश्चिम रेल्वेचा लोकलचा प्रवास गर्दीचा आणि धकाधकीचा आहे. बीकेसी येथून वांद्रे स्थानक किंवा कुर्ला स्थानक गाठणे हाच मोठा डोकेदुखी देणारा टास्क आहे. कारण येथील ऑटो रिक्षावाल्याची दादागिरी प्रवाशांना सहन करावी लागत असते. तसेच टॅक्सी आणि बेस्टची संख्या मर्यादित असल्याने मुंबईकरांचे हाल होत असतात.
बीकेसीच्या कर्मचाऱ्यांना फायदा
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) मेट्रो तीन या भुयारी मेट्रोचा आरे JVLR ते वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानक अशी मार्गिका सुरु झाली आहे. या भुयारी मेट्रोच्या पहिल्या भागाचा सध्या बीकेसीतील कर्मचाऱ्यांना लाभ होत आहे. आज पहिल्या दिवशी प्रवाशांनी पश्चिम उपनगरातील आपल्या घरांकडे जाण्यासाठी भुयारी मेट्रोचा लाभ घेतला. या मार्गात दहा स्थानके आहेत. बीकेसी ते आरे जेव्हीएलआर दरम्यान बीकेसी, वांद्रे कॉलनी, सांताक्रुझ मेट्रो, एअर पोर्ट टर्मिनल-1, सहार रोड, एअर पोर्ट टर्मिनल-2, मरोळ नाका, एमआयडीसी- अंधेरी, सिप्झ, आरे जेव्हीएलआर अशी दहा स्थानके आहेत. तर तिकीटाचे दर किमान 10 रुपये तर कमाल 50 रुपये असे आहेत.पहिल्या टप्प्यात 9 ट्रेन द्वारे बीकेसी ते आरे जेव्हीएलआर स्थानक सरासरी दर 6 मिनिटांना एक ट्रेन अशी सेवा आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 8532 प्रवाशांनी प्रवास केला तर रात्री उशीरापर्यंत 18,015 प्रवाशांनी प्रवास केला आहे.
मोबाईल कनेक्टीव्ही लवकरच मिळणार
भुयारी मेट्रो – 3 च्या प्रवाशांना लवकरच मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सध्या मात्र मोबाईल नेटवर्क तिकीट खिडक्या तसेच कॉन्कोर्सजवळ उपलब्ध असणार आहे. वायफाय सेवेमुळे त्यांना तिकीट खरेदी करणे सुलभ होणार आहे. सध्या ही सेवा तिकीट खिडक्या आणि कॉन्कोर्स जवळ उपलब्ध असली तरी भविष्यात प्लॅटफॉर्म आणि भुयारात देखील वायफायचा उपयोग प्रवाशांना करता येणार आहे. प्रवासी मोबाईल ऍप्लिकेशन, तिकीट काउंटर, तिकीट वेंडिंग मशीन आणि एमएमआरसी वेबसाइटवरून एकेरी आणि परतीच्या प्रवासाची तिकिटे खरेदी करू शकतात. MMRC लवकरच सर्व स्थानकांवर आणि ट्रेनच्या आत वेगवेगळ्या सेवा पुरवठाकडून अखंड 4G आणि 5G मोबाइल नेटवर्क कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणार आहे. मेट्रो-3 चे मोबाईल एप MetroConnect3 डाऊनलोड करावे असे आवाहन केले आहे.