Weather Update | पुढचे पाच दिवस महत्त्वाचे, बुलढाणा, वाशिम, पुण्यात पावसाला सुरुवात, वाचा कुठे कुठे यलो अलर्ट?
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून कोणत्याही क्षणी मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
प्रदीप कापसे, पुणे : राज्यातील हवामानात (Weather) पुन्हा एकदा बदल झालाय. मागील आठवड्यातच राज्यातील अनेक भागांना गारपीट आणि मुसळधार पावसानं झोडपून काढलं. येत्या काही दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर विदर्भातही वाशिम आणि बुलढाण्यात गारपीटीसह मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यातील कोथरुड भागात मुसळधार पावसासह गारपीटदेखील होत आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून कोणत्याही क्षणी मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
राज्यातील पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली , बीड, छ. संभाजीनगर , जालना, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांना पुढील पाच तासासाठी इशारा देण्यात आलाय. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह, वादळ आणि गारपीटीचाही इशारा देण्यात आलाय.
अवकाळी पावसाचं कारण काय?
मध्य महाराष्ट्र ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात अचानक हवामान बदल झालय. तेलंगणा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत हा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे हवेतील दमटपणा कमी झाला आहे. मात्र पुढील चार दिवस कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर या जिल्ह्यांना पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. कोकणात हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
बुलढाण्यात हरभऱ्याएवढ्या गारा
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात आज पुन्हा अवकाळी पाऊस झाला आणि गारपीट झाली. खामगाव तालुक्यातील चींचपुर परिसरात अवकाळी पाऊस आणि हरभऱ्या एवढ्या गारा पडल्या. गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे राहिलेल्या पिकांचे नुकसान झालेय. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
वाशिमध्येही गारपीट
वाशिमच्या मालेगाव, मंगरुळपिर,कारंजा तालुक्यात अनेक ठिकाणी पुन्हा विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्या आणि पाऊस सुरू आहे.. तसेच रिसोड तालुक्यात काही ठिकाणी गाराचा पाऊस पडला असून या अवकाळी पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांच नुकसान होण्याची शक्यता आहे… चिखली झोलेबाबा इथं निंबाच्या झाडावर वीज पडली आहे…अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे इझोरी बाजारपेठ मध्ये एकच धावपळ झाली आहे…
नांदेडमध्ये रात्री पाऊस
नांदेडमध्ये बुधवारी रात्री अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. काही जागी किरकोळ तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊसदेखील बरसलाय. वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील बरबडा सारख्या अनेक गावातील विद्युत पुरवठा रात्रीपासून खंडित झाला.