उत्तर प्रदेशातील निकालाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर परिणाम होणार का?; संजय राऊत यांचं थेट आणि रोखठोक उत्तर काय?
उत्तर प्रदेशसह चार राज्यात भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे या विजयाचा थेट संबंध मुंबई महापालिकेच्या निवडणुकीशी जोडला जात आहे. या चारही राज्यांच्या निवडणुकांचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई: उत्तर प्रदेशसह चार राज्यात भाजपची (bjp) सत्ता आली आहे. त्यामुळे या विजयाचा थेट संबंध मुंबई महापालिकेच्या निवडणुकीशी (bmc) जोडला जात आहे. या चारही राज्यांच्या निवडणुकांचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. उत्तर प्रदेश किंवा या चार राज्यांच्या निवडणुकांचा मुंबई महापालिका निवडणुकीशी काहीही संबंध नाही. गेली 50 वर्ष आम्ही महापालिका लढतोय आणि या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पालिकेवर कायम राहील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी एकीकडे हा दावा केलेला असतानाच दुसरीकडे भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सज्ज व्हा. आजपासूनच कामाला लागा, असे आदेशच फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यूपी तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, अशा घोषणा भाजपकडून दिल्या जात आहेत. त्याबाबतही राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वीही महाराष्ट्र बाकी है म्हणत होते. काल पवारांनी सांगितलं हम तयार है. काय करणार आहात अजून? आणखी धाडी माराल. अजून काय कराल? धमक्या आम्हाला माहीत आहे. तुम्हाला जे करायचं ते करा. आम्ही तयार आहोत, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री का हरले?
भाजपला मोठा विजय मिळाला आहे. उत्तर प्रदेश त्यांचंच राज्य होतं. पण अखिलेश यादव यांच्या गेल्यावेळेच्या तुलनेत तीनपट जागा वाढल्या. भाजपच्या विजयात मायावतीचं योगदान आहे. ओवेसींचंही आहे. त्यांना पद्मविभूषण, भारत रत्न द्यावं लागेल. आम्ही खूश आहोत. संसदीय राजकारणात हारजीत होत असते. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये भाजप जिंकला आहे. तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. उत्तराखंडमध्ये भाजपचे मुख्यमंत्री का हरले? गोव्यात दोन दोन उपमुख्यमंत्री का हरले?, असा सवाल राऊत यांनी केला.
संबंधित बातम्या:
Russia Ukraine War Live : युक्रेनमध्ये अडकलेल्या 242 भारतीय नागरिकांना घेऊन विशेष विमान दिल्लीत दाखल