मोठी बातमी! केज न्यायालयाबाहेर वाल्मिक कराड समर्थक आणि विरोधकांची गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज
वाल्मिक कराड याचे समर्थक आणि विरोधकांनी केज कोर्टाच्या परिसरामध्ये मोठी गर्दी केली आहे. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर देखील आरोप करण्यात आले होते. मात्र तो फरार होता. अखेर या घटनेच्या 22 दिवसांनंतर तो शरण आला आहे, त्याने पुण्यात सीआयडीसमोर शरणागती पत्कारली. त्यानंतर आता वाल्मिक कराड याला घेऊन सीआयडीचं पथक केजमध्ये दाखल झालं आहे. आज रात्री उशिरा या प्रकरणावर केजच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे वाल्मिक कराड याचे समर्थक आणि विरोधकांनी केज कोर्टाच्या परिसरामध्ये मोठी गर्दी केली आहे. गर्दीला पांगवण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून याठिकाणी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. सीआयडीचं पथक वाल्मिकी कराडला घेऊन केजमध्ये दाखल झालं असून या प्रकरणात आजच सुनावणी होणार आहे.
दरम्यान त्यापूर्वी केजमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांची दादागिरी पाहायला मिळाली. कोर्टाच्या आवारातील गाड्या बाहेर काढण्यासाठी त्यांनी दादागिरी केली, त्यांनी कोर्टाच्या आवारातच न्यायालयांच्या कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याचं समोर आलं आहे.
आजच सुनावणी
वाल्मिक कराडच्या रिमांडवर आज कोर्टात सुनावणी होणार आहे. सीयआयडीकडून केज कोर्टात याबाबत शिफारस करण्यात आली होती. वाल्मिक कराडच्या रिमांडवर रात्री कोर्टात सुनावणी व्हावी अशी मागणी सीआयडीकडून करण्यात आली होती, ही मागणी कोर्टानं मान्य केली. सीआयडीचं पथक वाल्मिक कराडला घेऊन केजमध्ये पोहोचलं आहे. कोणत्याही क्षणी सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कोर्टात काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दिवसभरात काय घडलं?
घटनेच्या 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड हा आज पुण्यात सीआयडीला शरण आला. त्यानंतर त्याचं मेडिकल चेकअप झालं. वाल्मिक कराड यांच्या रिमांडवर आजच सुनावणी करा अशी विनंती सीआयडीकडून न्यायालयाला करण्यात आली होती. न्यायालयानं सीआयडीची ही मागणी मान्य केली. त्यानंतर आता कराडला केजमध्ये आणण्यात आलं आहे.