कुणाला तरी वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी घेतला का ? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
बदलापूर मधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. आज सकाळी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात आणण्यात आला असून त्यानंतर तो कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल.
बदलापूर मधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. आज सकाळी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात आणण्यात आला असून त्यानंतर तो कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल. अक्षय शिंदेच्या मृत्यूमुळे न्याय मिळाला असे म्हणत एकीकडे जनता आनंद व्यक्त करत आहे, मात्र विरोधक या मुद्यावरून सरकारला धारेवर धरत आहेत. आरोपीला शिक्षा व्हायलाच पाहिजे, पण हे एन्काऊंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित विरोधकांकडून राजकारण सुरू आहे. मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाल्याचं शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे.
आता याच मुद्यावरून वंचित बहुज आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केलेत. आरोपी अक्षयला कोणत्या चौकशीसाठी नेलं जात होतं ? पोलिसांच्या मांडीला गोळी कशी लागली ? कुणाला तरी वाचवण्यासाठी आरोपीचा बळी घेतला का ? असे सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघआडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी संशय व्यक्त केलाय.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
बदलापूरमधील शाळेत मुलींवर अतिप्रसंग झाला, त्यातील आरोपींना शोधण्यात शिंदे-फडणवीस सरकार कमी पडलं. एफआयआर मध्ये दुरुस्ती झाली पाहिजे याची माहिती देण्यात आली. मदतनीस कसे मोकळे सुटतील याची काळजी घेतली गेली. आता या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला दुसऱ्या केससाठी घेऊन जात होते, तेव्हा त्याने रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतलं, फायरिंग केलं, त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याला नेमक्या कोणत्या चौकशीसाठी नेलं जातं होतं ? असा सवाल त्यांनी विचारला. नेमकं कशाच्या शोधासाठी आरोपीला घेऊन जात होते त्याचा खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली. सरकारने वस्तुस्थिती समोर मांडावी अशी विनंती करतो, त्यामुळे संशय राहणार नाही,असे ते म्हणाले.
या चकमकीमध्ये आरोपीला गोळ्या लागल्या, पोलिसही गोळी लागून जखमी झाले. ज्या पोलिस अधिकाऱ्याला लागले त्याचा मेडिकल रिपोर्ट सादर करावा, त्याला कुठे लागले हे कळवा ,जी आता चर्चा सुरू आहे ती थांबेल. पोलिसाला लागलेल्या गोळीचा मेडिकल रिपोर्ट पुढे आला पाहिजे. फायरिंग करताना माणूस हा समोरासमोर फायरिंग करतो, मग त्यांच्या मांडीला कशी गोळी लागली , हासुद्धा एक प्रश्न आहेच. त्याच उत्तरही समोर आलं पाहिजे,अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
कुणालातरी वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी घेतला का ?
कुणालातरी वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी गेलाय का ? असा संशयही आंबेडकर यांनी व्यक्त केला. ज्या शाळेत प्रकरण घडलं त्या शाळेत अनेक प्रकार घडलेत. आरोपी त्याबद्दल काही माहिती उघड करणार होता का ? अनेक संशय आहेत त्यामुळे त्याचा मेडिकल रिपोर्ट समोर आला पाहिजे. आणि त्या आरोपीला संध्याकाळच्या सुमारास कुठे घेऊन चालले होते याचा खुलासाही झाला पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.