प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मोठा निर्णय जाहीर, आता पुढे काय घडणार?

| Updated on: Jul 16, 2024 | 4:37 PM

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मोठा निर्णय जाहीर, आता पुढे काय घडणार?
प्रकाश आंबेडकर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी एक महत्त्वाची माहिती जारी केली होती. आपण आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठा निर्णय जाहीर करणार, असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार प्रकाश आंबेडकर यांनी आपला मोठा निर्णय जाहीर केला आहे. प्रकाश आंबेडकर राज्यात आता एससी, एसटी, ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. या यात्रेला 25 जुलैला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात होणार आहे. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालन्याला जाईल. यानंतर ७ किंवा ८ ऑगस्टला तारखेला या यात्रेची छत्रपती संभाजीनगर येथे सांगता होईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

“काही लोक नामांतराची आठवण करून देत आहेत. दोन गट पडले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद श्रीमंत मराठ्यांनी लावला आहे. काय स्वरुप होईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि नेत्यांना आहे. जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलनाची सुरुवात केली आहे. दुसऱ्याबाजूला मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सर्व मराठा नेते एनसीपीचे, काँग्रेसचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या बैठकीत राजकीय पक्षांची भूमिका काय? हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला. यात सामंजस्याचा तोडगा काढायचा असेल तर श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. त्यात एनसीपी आहे, काँग्रेस आहे, भाजप आहे आणि उद्धव ठाकरे गट आहे. हे जोपर्यंत भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत तोडगा निघणार नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“सऱ्या बाजूला या बैठकीत मुख्यमंत्र्यांना वंचितकडून विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी या राजकीय पक्षाच्या नेत्यांना व्यक्तिगत पत्र लिहावं. या प्रश्नावर म्हणजे जरांगे यांची जी मागणी आहे, मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या ही मागणी आहे, त्याबाबत राजकीय पक्षांची भूमिका काय आहे, त्याची विचारणा करून मग समान तोडगा काढता येईल. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की पत्र पाठवू. अजून पर्यंत वंचित आघाडीला ते पत्र मिळालं नाही. इतर पक्षांना मिळालं का याचा आमच्याकडे खुलासा नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेबद्दल काय म्हणाले?

“हे लोण आता फक्त मराठवाड्यापुरतं मर्यादित आहे असं मानत नाही. ते पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश हळूहळू पसरत चाललं आहे. कदाचित विदर्भातील वाशिम जिल्हा आणि बुलढाण्याचा काही भाग इफेक्ट होण्याची शक्यता आहे. या सर्व ओबीसी संघटना होत्या, त्यांची मागणी होती की वंचित जी भूमिका मांडतंय ती गावोगाव गेली पाहिजे. त्यामुळे पक्षाने असं ठरवलंय की या सामाजिक संघटनांना घेऊन २५ तारखेला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात करायची. त्याच दिवशी फुलेवाड्यात जायचं पुण्यात आणि २६ तारखेला सकाळी २६ जुलै ही महत्त्वाची तारीख आहे. या दिवशी शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. त्यामुळे शाहू महाराजांसमोर नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जन यात्रा काढणार आहे. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालन्याला जाईल. ७ किंवा ८ऑगस्टला तारखेला औरंगाबादमध्ये सांगता होईल”, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.