प्रकाश आंबेडकर यांचे उदाहरण देत भाजपने कॉंग्रेसला डिवचलं, म्हणाले ‘कॉंग्रेसमध्ये कॅन्सर…’
ईडी कारवाईच्या भीतीमुळे अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करताहेत हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहेत. अशी काही कुणावर कारवाई होत नसते. इंडीया आघाडी बिघडत चालली आहे. त्यामुळे अशी टीका भाजपवर होत आहे असे ते म्हणाले.
मुंबई : 12 सप्टेंबर 2023 | विधानसभेच्या भाजपच्या 106 पैकी 106 जागा सुरक्षित आहेत. सर्वच्या सर्व म्हणजेच भाजपच्या आता असलेल्या 106 जागा निवडून येतील. आमच्यासोबत जे सहकारी पक्ष आले आहेत. त्यांच्यासोबत समन्वय साधावा आणि विधानसभेच्या अधिकाधिक जागा कशा जिंकता येतील याबाबत भाजप आमदारांची बैठक घेण्यात आली. आमची बैठक ही राजकीय नव्हती. राज्यातील कुणीही व्यक्ती विकासापासून वंचित राहू नये असे या बैठकीत आमदारांना सांगितले. आता विश्वकर्मा योजना येत आहे. त्यासाठी सर्वानी काम करावे असेही या बैठकीत सांगितले, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली
भाजप आमदारांची महत्वाची बैठक मुंबईतील गरवारे क्लब येथे झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईडी कारवाईच्या भीतीमुळे अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करताहेत हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहेत. अशी काही कुणावर कारवाई होत नसते. इंडीया आघाडी बिघडत चालली आहे. त्यामुळे अशी टीका भाजपवर होत आहे असे ते म्हणाले.
अजित पवार यांना बैठक घेण्याचा अधिकार
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात येऊन बैठका घेतात. अधिकाऱ्यांना या बैठकीला बोलावतात, आदेश देतात. यावरून भाजपचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. यावर बोलताना ते म्हणाले, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना कोणतीही बैठक केव्हाही घेता येते. अर्थमंत्री म्हणून तसेच खर्चित आणि अखर्चित रकमांचा हिशोब घेण्यासाठी त्यांना बैठक घ्यावी लागते.
उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडा
‘सनातन धर्म संपवून टाकू असे म्हणणाऱ्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी यांच्या पक्षासोबत उद्धव ठाकरे यांनी युती केली आहे. उदयनिधी यांनी जे वक्तव्य केले ते विधान उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? याचे स्पष्टीकरण त्यांनी राज्याच्या जनतेला दिले पाहिजे.’
‘एका पक्ष नेत्याने समाजात तेढ निर्माण करणारी, तसेच लोकांच्या जनभावना बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. हा असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अशी विधान करणे योग्य नाही. जर ठाकरे यांना हे विधान मान्य नसेल तर त्यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडावे’, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ द्यावा
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. राज्यातील 13 कोटी जनतेच्या माध्यमातून त्यांना विनंती केली आहे. सर्व पक्ष त्यांच्या पाठीशी आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिलं. पण ते काही लोकांमुळे गेले. ते पुन्हा मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व उभे आहोत. त्यामुळे त्यांनी सरकारला वेळ द्यायला हवा अशी विनंती त्यांनी केली.
कॉंग्रेसमध्ये कॅन्सर, बहुजनांच्या विरोधात
कॉंग्रेसमध्ये कॅन्सर आहे. काँग्रेस नेहमी कन्व्हिस न करता लोकांना कन्फ्युज करते. कॉंग्रेसने गेली ६० वर्ष केवळ जातीय राजकारण केलं. कधीच योजना जनतेला दिल्या नाहीत. कोणाचा बाप मुंबईला तोडणार नाही हे सर्वांना माहित आहे. पण, उगाच राजकारण करायचं आहे म्हणून हे सर्व सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांना कॉंग्रेस मविआमध्ये घेत नाही यावरूनच कॉंग्रेस बहुजनांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होते अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.