प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर रुग्णालयात दाखल, सुजात यांचा कार्यकर्त्यांना संदेश काय ?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अकोल्यात यंदा तिरंगी लढत होणार आहे. आंबेडकर विरुद्ध महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. या लढतीत आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी वंचितचे कार्यकर्ते जोरदार प्रयत्न करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनीही स्वत:ला निवडणूक प्रचारात झोकून दिलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ऊन लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. माझी तब्येत चांगली आहे. काळजी करण्याचं कारण नाही. मी आंबेडकर जयंतीपासून पुन्हा प्रचारात सहभागी होणार आहे, असा संदेश सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तसेच प्रचारात खंड पडू देऊ नका, आवाहनही त्यांनी केलं आहे.
अकोल्यात गेल्या एक आठवड्यापासून उन्हाचा पारा वाढत आहे. अकोल्यातील तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत गेलं आहे. या ऊन्हाचा फटका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांना बसला आहे. त्यामुळे सुजात आंबेडकर यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सुजात यांना कार्यकर्त्यांच्या नावे एक संदेश जारी केला आहे. कार्यकर्त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही.. 14 एप्रिलनंतर आपल्या सर्वांमध्ये मी सामील होणार आहे, असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
वडिलांच्या प्रचाराची धुरा…
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वडिलांच्या प्रचारासाठी सुजात यांनी अकोल्यात तळ ठोकला आहे. अकोल्यातील गावागावात जाऊन सुजात आंबेडकर प्रचार करत आहेत. वंचितची भूमिका लोकांना समजावून सांगत आहेत. तसेच वंचितचा सोशल मीडियाही सांभाळत आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका, रॅली, सभा आणि पदयात्रा यावर त्यांनी भर दिला आहे. भर उन्हातान्हात त्यांचा प्रचार सुरू आहे. त्यामुळेच त्यांना ऊन लागल्याने अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, त्यांची प्रकृती ठणठणीत असून चिंता करण्याचं कारण नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
वंचितची पाचवी यादी जाहीर
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने पाचवी यादी जाहीर केली आहे. या पाचव्या यादीत 10 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. यात रायगडमधून कुमुदनी चव्हाण, धाराशीवमधून भाऊसाहेब अंधळकर, नंदूरबारमधून हनुमंत कुमार सूर्यवंशी, जळगावमधून प्रफुल्ल लोढा, दिंडोरीतून गुलाब बरडे, पालघरमधून विजय म्हात्रे, भिवंडीतून निलेश सांबरे, मुंबई नॉर्थमधून बीना सिंह, मुंबई नॉर्थ वेस्टमधून संजीव कलकोरी आणि मुंबई साऊथ सेंट्रलमधून अब्दूल हसन खान यांना उमेदवारी दिली आहे. वंचितने मुंबईतील तीन जागांवरील उमेदवार घोषित केले आहेत. अजून तीन जागांवरील उमेदवारांची नावे घोषित होण्याची बाकी आहेत.