वंदेभारतला ‘या’ स्थानकावर थांबा द्या ! अन्यथा आंदोलन, कोकण विकास समितीचा इशारा
कोकण मार्गावर धावणाऱ्या बहुतांश गाड्या परंपरागत स्थानकांवरच थांबत असल्याने इतर स्थानकातील लोकांनी काय केवळ गाड्या मोजत बसावे काय ? असा सवाल कोकण विकास समितीने केला आहे.
मुंबई : सेमी हायस्पीड वंदेभारत एक्सप्रेसच्या मुंबई ते गोवा मार्गावर एकीकडे चाचण्या सुरू झाल्या आहेत. सीएसएमटी ते मडगांव हे अंतर अवघ्या सात तासांत पार केले असतानाच आता या वेगवान गाडीची सुरूवात होण्याआधीच तिच्या वेगाला ब्रेक लागला आहे. या गाडीला आता खेड थांबा द्यावा अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे. रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आली आली आहे.
सीएसएमटी ते मडगाव दरम्यान वंदेभारत एक्सप्रेसच्या चाचण्या सुरू आहेत, ही आनंदाची बाब आहे. परंतू वंदेभारतलाही परंपरागत थांबे मिळतील असे वातावरण आहे, त्यामुळे वंदेभारत एक्सप्रेसला ‘खेड’ येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून केली आहे.
याआधीच जनशताब्दी, मंगला, तेजस, गरीबरथ, एलटीटी – कोचुवेली, एलटीटी – करमाळी, तिरूनवेल्ली – दादर, मंगळुरु – मुंबई, हिसार – कोयमतूर, इंदूर – कोचुवेली या गाड्यांना ‘खेड’ ला थांबा मिळण्याची मागणी प्रलंबित असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. वंदेभारतला जर खेड येथे थांबा मिळाला नाही तर हे जखमेवर मीठ चोळल्या सारखे होईल, त्यामुळे मग प्रवाशांकडे आंदोलना शिवाय दुसरा उपाय नसेल असे संघटनेने या पत्रात म्हटले आहे.
इतर लोकांनी काय गाड्याच मोजाव्या काय ?
मुंबईहून रात्री उशीरा किंवा पहाटे लवकर सुटणाऱ्या जनशताब्दी, मंगला, तेजस, करमाळी आणि संध्याकाळी मुंबईला येणाऱ्या जनशताब्दी, तेजस, करमाळी या गाड्या खेडला थांबा घेत नाहीत. वंदेभारतला जर खेडला थांबा दिला नाही तर अर्ध्या ते एक तासात खेडला न थांबणाऱ्या एकूण चार गाड्या होतील. या गाड्या परंपरागत स्थानकावरच थांबत असल्याने इतर स्थानकातील लोकांनी काय केवळ गाड्या मोजत बसावे काय ? असा सवालही अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी केला आहे.
वेग आणि आरामदायीपणा
वंदेभारत एक्सप्रेस ही भारताची पहिली सेमी हायस्पीड वर्गवारीची ट्रेन आहे. वेग आणि आरामदायीपणा असे दोन्ही गुणांचे मिश्रण वंदेभारत एक्सप्रेसमध्ये आहे. या ट्रेनचा वेग प्रति तास 160 ते 180 किमी पर्यंत आहे. त्यामुळे दोन शहरातील अंतर वेगाने कापता येत असल्याने या गाड्यांची लोकप्रियता वाढली आहे.
पाचवी वंदेभारत प्रतिक्षेत
महाराष्ट्राला आतापर्यंत चार वंदेभारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत तर मुंबईला आतापर्यंत तीन वंदेभारत मिळाल्या आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधी नगर, नागपूर ते बिलासपूर, सीएसएमटी ते साईनगर – शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर या चार वंदेभारत सुरू असताना आता सीएसएमटी ते मडगांव ( गोवा ) मार्गावर वंदेभारतच्या कालपासून चाचण्या सुरू झाल्या आहेत.