वंदेभारतने अवघ्या सात तासांत गोवा गाठा, सीएसएमटी ते मडगाव चाचणीला यश
वंदे भारत एक्स्प्रेसला पहिल्याच चाचणीत अवघे सात तास लागल्याने चाकरमान्यांच्या प्रवसाच्या वेळेत मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
मुंबई : मुंबई ते गोवा मार्गावर सेमी हायस्पीड वंदेभारत एक्सप्रेसच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. काल सीएसएमटी ते मडगाव या मार्गावर वंदेभारतच्या पहिल्याच चाचणीला सात तास लागले आहेत. आलिशान वंदेभारतच्या नविन आवृत्ती वेग दर ताशी 180 किमी असल्याने मुंबईकरांचा कोकण प्रवास वेगवान होणार आहे. मध्य रेल्वेच्या कोकण मार्गावर वंदेभारत एक्सप्रेसच्या समावेशाने आता महाराष्ट्राला पाचवी वंदेभारत मिळणार आहे. याआधी नागपूर ते बिलासपूर, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, सीएसएमटी ते साईनगर-शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर अशा चार वंदेभारत महाराष्ट्राला मिळाल्या आहेत.
मुंबई-गोवा मार्गावर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण मार्गावर मंगळवारपासून वंदेभारतच्या चाचण्यांना सुरूवात करण्यात आली आहे. या चाचणीत वंदेभारतने सीएसएमटी ते मडगाव अंतर अवघ्या सात तासांत पार केले आहे. या मार्गावर तेजस एक्स्प्रेसला हेच अंतर पार करण्यासाठी आठ तासांहून अधिक वेळ लागतो. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसला पहिल्याच चाचणीत अवघे सात तास लागल्याने चाकरमान्यांच्या प्रवसाच्या वेळेत मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
पहिली इंजिन लेस ट्रेन
मेक इन इंडीया मोहिमे अंतर्गत तयार करण्यात आलेली वंदेभारत एक्सप्रेस देशातील पहिली इंजिन लेस ट्रेन आहे. तिचा वेग प्रति तास 160 ते 180 इतका असल्याने तिला देशाची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन संबोधले जात आहे. या ट्रेनची निर्मिती ट्रेन सेट – 18 अंतर्गत चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरी ( आयसीएफ ) मध्ये करण्यात आली होती. देशातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस फेब्रुवारी 2019 मध्ये नवी दिल्ली ते वाराणसी मार्गावर चालविण्यात आली होती.
असा वाचवणार वेळ
मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटीतून सकाळी 5.53 वाजता सुटली आणि दुपारी 12.50 वाजता मडगावला ( गोवा ) पोहोचली. पहिल्याच चाचणीत वंदे भारतने हे अंतर अवघ्या सात तासात पार केले आहे. त्यामुळे मुंबई-गोवा प्रवासाचा वेळ कमी होण्याची चिन्हे आहेत. याच अंतरासाठी वेगवान तेजस एक्सप्रेसला आठ तासांहून अधिकचा वेळ लागतो. त्यामुळे मुंबई ते कोकणाचा प्रवास वेगवान होणार आहे. त्यामुळे गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे.