Vice President Election : 83 वर्षाचे पवार मतदानाला पोहोचले, मात्र ठाकरेंकडील अर्ध्या खासदारांची दांडी, उपराष्ट्रपतीपदाच्या मदतानावेळी काय घडलं?
वयाने 83 वर्षाचे असणारे शरद पवार (Sharad Pawar) हे यावेळी मतदानाला उपस्थित असल्याचे दिसून आले, त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडील अर्ध्याहून जास्त खासदारांनी या मतदानाला दांडी मारल्याचे दिसून आलं,
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वीच देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू (President Draupadi Murmu) या निर्विवाद निवडून आल्या. यावेळी शिवसेनेच्या खासदारांनी आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची संधी मिळत आहे, त्यामुळे आम्ही मुर्मू यांना पाठिंबा देत आहे असे म्हणत एनडीएच्या (NDA) उमेदवाराला पाठिंबा जाहीर करून टाकला. तर महाविकास आघाडीतील शिवसेनेचे सोबती असणारे पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे यूपीए सोबतच कायम राहिले. आज आता दिल्लीत उपराष्ट्रपती पदासाठी ही मतदान पार पडलंय. मात्र या मतदान प्रक्रियेवेळी काही वेगळेच चित्र दिसून आलं. वयाने 83 वर्षाचे असणारे शरद पवार (Sharad Pawar) हे यावेळी मतदानाला उपस्थित असल्याचे दिसून आले, त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडील अर्ध्याहून जास्त खासदारांनी या मतदानाला दांडी मारल्याचे दिसून आलं.
आधीच अनेक खासदारांनी साथ सोडली
आधीच बारा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत लोकसभेतही वेगळा गट स्थापन केलाय. त्यामुळे त्यांचं मतदान तर एनडीएच्या उमेदवारालाच होणार होतं, मात्र ठाकरेंसोबत उरलेल्या इतर काही खासदारांनी यूपीएच्या उमेदवार मार्गरेट अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आज मतदानावेळी वेगळी स्थिती दिसून आली. या मतदानाला खासदार अरविंद सावंत, खासदार राजन विचारे, खासदार संजय जाधव, तसेच खासदार विनायक राऊत हे अनुपस्थितीत दिसून आले, तर खासदार संजय राऊत हे सध्या ईडीच्या कोठडीत असल्यामुळे मतदान करू शकले नाहीत. तर गजानन कीर्तिकर हे आजारी असल्याने मतदानाला येऊ शकले नाहीत असं सांगण्यात आलं.
फक्त तीन खासदारांनी मतदान केलं
त्यामुळे यावेळी फक्त खासदार अनिल देसाई, खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनीच मतदान केलं. ठाकरेंकडील केवळ तीन खासदार या मतदानाला उपस्थित राहिल्याने राजकीय भुवया पुन्हा उंचावल्या आहेत. शिवसेनेकडून शिंदे गटावर आणि भाजपवर टीका करणारे आणि तुटून पडणारे मुख्य नेतेच या मतदानाला गैरहजर राहिल्याने वेगळीच कुजबूज सुरू झाली आहे.
खासदारांच्या दांडीमुळे संभ्रम
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी तब्बल 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले. त्यानंतर शिंदे आणि भाजप सोबतच गेलं पाहिजे असे अनेक दिवस हे खासदार उद्धव ठाकरे यांना समजावत राहिले. मात्र तरीही उद्धव ठाकरे यांनी ऐकल्याने शेवटी बारा खासदार हे शिंदे गटात सामील झाले. मात्र आता या मतदानामुळे उरलेल्या नेत्यांबाबतही संभ्रम निर्माण झालाय.