Video : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात!
बच्चू कडू यांनी अवैधरित्या गुटखाविक्रीचं एक स्टिंग ऑपरेशन केलं. यामध्ये लाचखोरीचं एक धक्कादायक वास्तव उजेडात आलं आहे. बच्चू कडू यांनी वेशांतर करुन तपासणी करत असताना एका दुकानदाराला प्रश्न विचारला की, हा गुटख्याचा माल मी विकू शकतो का? त्यावर दुकानदाराने दिलेलं उत्तर अत्यंत धक्कादायक होतं.
अकोला : शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि पालकमंत्री बच्चू कडू सोमवारी वेशांतर करुन युसुफखाँ पठाण बनले! त्यांनी अकोला आणि पातूर शहरात शासकीय कार्यालये, स्वस्त धान्य दुकाने आणि काही दुकानांची तपासणी केली. यावेळी बच्चू कडू यांनी अवैधरित्या गुटखाविक्रीचं एक स्टिंग ऑपरेशन केलं. यामध्ये लाचखोरीचं एक धक्कादायक वास्तव उजेडात आलं आहे. बच्चू कडू यांनी वेशांतर करुन तपासणी करत असताना एका दुकानदाराला प्रश्न विचारला की, हा गुटख्याचा माल मी विकू शकतो का? त्यावर दुकानदाराने दिलेलं उत्तर अत्यंत धक्कादायक होतं. दुकानदाराने दिलेल्या उत्तरामुळे राज्यातील लाचखोरीचं वास्तव पुन्हा एकदा सर्वांसमोर आल्याचं पाहायला मिळालं. बच्चू कडू यांचा स्टिंग ऑपरेशनचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (Bacchu Kadu sting operation for illegal sale of gutka in Akola district)
या व्हिडीओमध्ये बच्चू कडू उर्फ युसुफखाँ पठाण एका दुकानदाराला विचारतात की मी हा गुटख्याचा माल विकू शकतो का? त्यावर दुकानदारांच उत्तर असं होतं, ‘हा माल दोन नंबरचा आहे. तसा विकू शकत नाही. तुम्ही हे काम करु शकणार नाही. त्यामुळे याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. यात अनेक लोकांना हप्ते द्यावे लागतात. हे काम सोपं नाही. आम्हाला पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’. दुकानदाराचं हे उत्तर ऐकून अकोला जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रीचं वास्तव उजेडात आलं आहे. बच्चू कडू यांच्या या स्टिंग ऑपरेशननंतर पातूर इथल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण महत्वाची बाब म्हणजे हा प्रकार एका दुकानदारापुरता मर्यादित नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री आणि अन्य काळ्या धंद्यांविरोधात पालकमंत्री काय कारवाई करतात, याकडे अकोलावासियांचं लक्ष लागून राहिलं आहे.
सरकारी कार्यालये, स्वस्त धान्य दुकानांची तपासणी
बच्चू कडू यांनी वेशांतर करुन सरकारी कार्यालये, स्वस्त धान्य दुकानांना भेट दिली. तिथे धान्य वितरणात काही काळाबाजार तर होत नाही ना? याची माहिती त्यांनी घेतली. त्याचबरोबर त्यांनी महानगरपालिकेतही धडक दिली. विविध विभागात जाऊन त्यांनी तिथल्या कामकाजाची पाहणी केली. महापालिका आयुक्त निमा अरोरा त्यांच्या कक्षात उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या स्विय सहायकांशी त्यांनी संवाद साधला. महत्वाची बाब म्हणजे महापालिकेली एकही कर्मचारी बच्चू कडू यांना ओळखू शकला नाही. बच्चू कडू तिथून निघून गेल्यानंतर मात्र महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
पातूरमधील सरकारी कार्यालयांमध्येही धडक
अकोला शहरातील शासकीय कार्यालयांना भेट दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आपल्या मोर्चा पातूर शहराकडे वळवला. तिथल्या शासकीय कार्यालयामध्ये भेटी दिल्यानंतर आजूबाजूच्या दुकानांमध्ये जाऊन गुटख्याची विक्री होते का? याचीही पाहणी त्यांनी केलीय. बच्चू कडू यांनी वेशांतर करुन टाकलेल्या एकप्रकारच्या धाडीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. सध्या अकोला जिल्ह्यात बच्चू कडू यांच्या वेशांतराचीच चर्चा सुरु आहे.
संबंधित बातम्या :
लाल दिव्याची गाडी, पण हक्काचं घर नाही; बच्चू कडूंचं खरं नाव माहीत आहे का?
अधिकाऱ्यांनी फाईली दाबल्या तर कायदा मोडून तुरुंगातही जाईन, रक्तदान करुन बच्चू कडूंनी पदभार स्वीकारला