चार पक्षांचे ‘हॉटेल पॉलिटिक्स’, दोन पक्ष निर्धास्त; जिंकून येण्याची 100 टक्के खात्री?
राज्यात उद्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार मैदानात आहेत. राज्यातील सहाही प्रमुख पक्षांनी या निवडणुकीत आपले उमेदवार दिले आहेत. एक उमेदवार एक्स्ट्रा झाल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे मते फुटू नयेत, आमदार कुठल्याही अमिषाला भुलू नये म्हणून राज्यात हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीने वातावरण तापवलं आहे. विधान परिषदेच्या एकूण 11 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. एकूण 12 उमेदवार मैदानात असल्याने कुणाची विकेट पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीने एक्स्ट्रा उमदेवार दिल्याने उद्याच्या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी खबरदारी घेतली आहे. आमदार फुटू नये म्हणून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यातील सहा प्रमुख पक्षांपैकी चार पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. तर दोन पक्षांनी आमदारांना हॉटेलमध्ये न ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या दोन राजकीय पक्षांना आमदार फुटण्याची भीती नाही का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
भाजप, शिंदे गट, अजित पवार गट आणि ठाकरे गटाने आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलात ठेवलं आहे. तर काँग्रेस आणि शरद पवार गटाने मात्र आपल्या आमदारांना हॉटेलात न ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेसचा एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर शरद पवार गटाने शेकापला पाठिंबा दिला आहे. असं असूनही दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांची हॉटेलात बडदास्त ठेवलेली नाही. या दोन्ही पक्षांना आमदार फुटतील याची भीती वाटत नाही का? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
कारण काय?
या निवडणुकीत एकूण 274 मतदार आहेतय. निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे. काँग्रेसकडे 37 मते आहेत. त्यामुळे त्यांचा उमेदवार सहज निवडून येणार आहे. उलट काँग्रेसची अतिरिक्त मते महाविकास आघाडीकडे वळवली जाणार आहेत. प्रमाणापेक्षा जास्त मतांचा कोटा असल्याने मते फुटली तरी फरक पडणार नाही, असं काँग्रेस नेतृत्वाला वाटत असावं म्हणूनच त्यांनी हॉटेल पॉलिटिक्स टाळल्याचं सांगितलं जात आहे. तर शरद पवार गटाकडे 12 मते आहेत. मात्र, त्यांनी निवडणुकीत उमेदवार दिलेला नाही. त्यांनी शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटानेही उमेदवारच नसल्याने हॉटेल पॉलिटिक्स टाळल्याचं सांगितलं जात आहे.
कुणाचे किती उमेदवार?
भाजपने पाच उमेदवार दिले आहेत. पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर शिंदे गटाने भावना गवळी आणि कृपाल तुमाने या दोन उमेदवारांना तिकीट दिलं आहे. अजितदादा गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना मैदानात उतरवलं आहे. काँग्रेसने प्रज्ञा सातव आणि शेकापने जयंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. जयंत पाटील हे शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली जात आहे.
कोणत्या हॉटेलात कुणाचे उमेदवार?
शिंदे गटाने वांद्रे येथील ताज लँडस् एन्ड हॉटेलात त्यांचे आमदार उतरवले आहेत. एका हॉटेलातील एका सूटचं भाडं 15 ते 25 हजार आहे. अजित पवार गटाने विमानतळाजवळच्या हॉटेल ललितमध्ये आमदारांची राहण्याची व्यवस्था केली आहे. तर भाजपने कफ परेडच्या प्रेसिडेंट हॉटेलात आमदारांना ठेवलं आहे. तसेच ठाकरे गटाने परळच्या आयटीसी ग्रँड मराठा हॉटेलात आमदारांना ठेवलं आहे. ग्रँड मराठा हॉटेलात एका सूटची किंमत 12 ते 15 हजार रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.