उद्धव ठाकरेंना धक्का, नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट; विजय करंजकर आता थेट शिंदे गटात
त्यांचे अनेक वेळा अनेक स्टेटमेंट झाले. आधी म्हणाले, मला बोलावलंच नाही, आता म्हणतात तीन वेळा बोलवलं, कालच्या सभेत म्हणाले, मला बोलवलं, थांबवलं. उद्धव साहेबांनी रिस्पेक्टली बोलावलं होतं. त्यांना शिंदे गटचे तिकीट मिळणार होते. भाजपचा सपोर्ट मिळणार होता म्हणून त्यांचं चालू होते. एक महिना वेळ वाया घालवला.
नाशिक लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विटस्ट आला आहे. ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांना आश्वासन देऊन ही तिकीट मिळालं नाही. त्यामुळे करंजकर यांनी बंडाचं निशान फडकवलं. करंजकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी ठाकरे गटाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, करंजकर हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आता करंजकर यांनी थेट शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे प्रवेश करणार आहेत. करंजकर यांचा शिंदे गटातील प्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्कादायक मानला जात आहे.
विजय करंजकर यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. त्यांना तिकीट देण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. पण ऐनवेळी करंजकर यांचं तिकीट कापलं गेलं. राजाभाऊ वाजे यांना तिकीट दिल्याने ते नाराज झाले. या नाराजीतूनच त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. त्यांची समजूत काढण्याचे ठाकरे गटाकडून अनेक प्रयत्न झाले. पण गेल्या तीन आठवड्यांपासून नाराज असलेल्या करंजकर यांनी माघार घेण्यास नकार दिला. कालच्या जाहीरसभेतही करंजकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
गोडसे यांचं पारडं जड
दरम्यान, शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब चौधरी यांनी मध्यस्थी केल्यानंतर विजय करंजकर हे शिंदे गटात येण्यास तयार झाले. त्यानंतर आता ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे करंजकर हे उमेदवारी अर्ज मागे घेणार असून शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा प्रचार करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. करंजकर हे शिंदे गटात आल्याने गोडसे यांचं पारडं जड होणार आहे. तर ठाकरे गटाला मात्र मोठा फटका बसणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न
दरम्यान, सुधाकर बडगुजर यांनी विजय करंजकर यांच्यावर टीका केली आहे. विजय करंजकर हा अतिशय खोटारडा माणूस आहे. तो सातत्याने खोटं बोलतो असतो. 2017 ला महापालिकेच्या निवडणुकीत काय शेण खाल्ले हे मातोश्रीला पण माहिती आहे. लढायचं की नाही लढायचं हा त्यांचा प्रश्न आहे. तो लढेल असे वाटत नाही. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी त्यांनी मिटिंग घेतली. शिवसेना-भाजप शिंदे गटाला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी हा मेळावा झाला आहे. करंजकर कृती करून हेतू साध्य करतील असं वाटत नाही, असं सुधाकर बडगुजर म्हणाले.
औकात मत भुलो
माजी आमदार वसंत गीते यांनी चार वेळा फोन केला भेटायला येऊ का म्हणून विचारलं. पण करंजकर यांनी भेट नाकारली. त्यांच्याबरोबर आमचा उमेदवार जाणार होता. भेट घेणार होता. तुम्हाला भेट घ्यायची नाही. मातोश्रीवर जायचं नाही. याचा अर्थ तुमच्या मनात दुसरं काही चाललं आहे. इमू प्रकरण पंचक्रोशीतील लोक अजून विसरलेले नाहीत. कितनी ही बडे झुले मे झूलो, अपनी औकात मत भुलो, असा इशाराच त्यांनी दिला.
लक्ष देत नाही
त्यांचे अनेक वेळा अनेक स्टेटमेंट झाले. आधी म्हणाले, मला बोलावलंच नाही, आता म्हणतात तीन वेळा बोलवलं, कालच्या सभेत म्हणाले, मला बोलवलं, थांबवलं. उद्धव साहेबांनी रिस्पेक्टली बोलावलं होतं. त्यांना शिंदे गटचे तिकीट मिळणार होते. भाजपचा सपोर्ट मिळणार होता म्हणून त्यांचं चालू होते. एक महिना वेळ वाया घालवला. उमेदवारी अर्ज दाखल करायला चार लोक आणि मेळाव्याला हजार लोक होते. याचा अर्थ बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. म्हणूनच मी विजय करंजकर यांच्याकडे लक्ष देत नाही, असं बडगुजर म्हणाले.