विजय वड्डेटीवार विरोधी पक्ष नेते की दिल्लीचे एजंट, राष्ट्रवादीच्या आमदाराचा हल्लाबोल
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारच्या योजना तसेच पक्ष संघटना वाढवणे, राज्यात वेगवेगळ्या आघाडीद्वारे काम करण्यावर भर देण्यात येणार आहे.
मुंबई : १६ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवरून राज्यातले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या भेटीवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले होते. शरद पवार सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातली असावी. त्यामुळेच अजित पवार हे सतत शरद पवार यांची भेट घेत असावेत, असे वडेट्टीवार म्हणाले होते. त्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टिका होत आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वडेट्टीवार यांना टोला लगावताना शरद पवार यांना कोण ऑफर देऊ शकतो हा या वर्षातील सर्वात मोठा जोक असल्याचं म्हटलयं. त्यांची उंची किती आहे. त्यांची लोकसभेतील कारकीर्द किती, त्यांना कोण ऑफर देणार असा सवालही त्यांनी केला.
शरद पवार आणि अजित पवार भेटीवर राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात टिका केली होती. त्यावर मिटकरी यांनी जोरदार टोला लगावला. ईडीची नोटीस आल्यानंतर जे भूमिका बदलतात त्यांनी आम्हाला सांगू नये. भाजपावर तुम्ही टीका करत होता. नंतर नोटीस आली. त्यामुळे त्यांनी भाषा बदलली , त्यांनी त्यांच्या पक्षात काय सुरू आहे ते पहावे, असे ते म्हणाले.
कॉग्रेस नेत्यांमध्ये काही संभ्रम तयार होत आहे. कौटुंबिक नात्यामुळे पवार यांच्या भेटी होत आहेत. त्यात दादांनी, साहेबांनी आपली भुमिका मांडली आहे. शरद पवार ज्या पद्धतीने सभा घेत आहेत त्यावर आमचे ओबीसी नेते आपली भुमिका स्पष्ट करतील. सगळ्यात महत्वाचे आम्हीही उत्तर सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हेच प्रमुख नेते असतील. आमच्यात उत्तम समन्वय असुन कोणतीही धूसफुस नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा विधाने पहाता त्यांचे दिल्लीत भाजपासोबत इतके संपर्क आहे की ते विरोधी पक्ष नेते आहेत की एजंट हे समजत नाही, असे खरमरीत टोला त्यांनी लगावला.