वाद आणखी चिघळण्याची शक्यता, सावरकरांचे नातू राहुल गांधी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात, काय होणार?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झालाय.
वाशिम : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झालाय. राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर संतापले आहेत. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार केलीय. राहुल गांधींना तातडीने अटक करा, अशी मागणी त्यांनी केलीय. त्यांच्या या मागणीमुळे या प्रकरणात सुरु असलेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राहुल गांधींच्या विरोधात भाजप, मनसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत.
“ज्या सावरकरांनी देशासाठी कष्ट भोगले, 27 वर्षे भोगलं, 13 वर्षे स्थलबद्ध आणि 14 वर्षाचा कारावास भोगला, असा एकमवे राजकीय नेताय, पण त्यांचा घोर अपमान राहुल गांधींनी केलाय. ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, पगार घेत होते, असं म्हणत त्यांनी मिमिक्री करुन सावरकरांचा अपमान केलाय”, असं रणजीत सावरकर म्हणाले.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी हिंगोलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं.
“सावरकर हे इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसविरोधात सावरकर इंग्रजांसोबत काम करायचे”, असं विधान राहुल गांधींनी केलं.
“मैं आपका नौकर रहना चाहता हुं, असं पत्र सावकरांनी इंग्रजांना लिहिलं”, असा दावा राहुल गांधींनी केला. तसेच यावेळी राहुल गांधींनी पत्रही दाखवलं.
राहुल गांधींच्या वक्तव्याचा व्हिडीओ खासदार राहुल शेवाळेंनी कार्यक्रमात दाखवला.
राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिंदे गट आक्रमक झाले. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवण्याची मागणी राहुल शेवाळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात मनसेही शेगावात निषेध नोंदवणार आहे. त्यासाठी मनसेचे नेते मुंबईहून शेगावच्या दिशेला निघाले आहेत.
राज्यात ठिकठिकाणी राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्यात आलंय.
या दरम्यान राहुल गांधींनी शिंदे-फडणवीस सरकारला भारत जोडो यात्रा थांबवून दाखवा, असं आव्हान दिलंय.