पंकजा मुंडेंसोबत काम करणार नाही : विनायक मेटे
बीड: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमध्ये धक्का देण्याच्या तयारीत आहेत. पंकजा मुंडेंकडून कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, विनायक मेटे यांनी बीडमध्ये पंकजा मुंडेंसोबत काम करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याचा आरोप शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी एका बैठकीत केला. त्यामुळे शिवसंग्राम […]
बीड: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमध्ये धक्का देण्याच्या तयारीत आहेत. पंकजा मुंडेंकडून कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, विनायक मेटे यांनी बीडमध्ये पंकजा मुंडेंसोबत काम करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याचा आरोप शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी एका बैठकीत केला. त्यामुळे शिवसंग्राम राज्यात भाजपसोबत काम करेल, मात्र बीड जिल्ह्यात काम करणार नाही, असा निर्णय शिवसंग्रामने घेतला आहे. काम न करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरदेखील ही बाब घालणार असल्याचे शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सांगितले. शिवसंग्रामच्या या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना जवळ केल्यानंतर खऱ्या अर्थाने विनायक मेटे हे नाराज झाले. तिथूनच मेटे – मुंडेंत राजकीय तेढ निर्माण झाला.
पंकजा मुंडे एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर शिवसंग्रामचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना देखील मेटे यांच्यापासून दूर केले. त्यामुळे मेटे आणि मुंडेंचं राजकीय वैर शिगेला पोहोचलं. त्यामुळेच आता कार्यकर्त्यांच्या इच्छेवरुन बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंसोबत काम न करण्याचा निर्णय शिवसंग्रामने घेतला आहे.
मेटेंचीही कुरघोडी
पंकजा मुंडे यांनी शिवसंग्राममध्ये फोडाफोडीचे राजकारण केल्याचा आरोप शिवसंग्रामचा आहे. त्यानंतर संतप्त झालेले मेटेही गप्प बसले नाहीत. परळी येथील नाराज असलेले पंकजा समर्थक फुलचंद कराड यांच्याशी गळाभेट घेऊन, त्यांनी शिवसंग्राम आणि भगवान सेना एकत्रित काम करतील असे जाहीर केले. फुलचंद कराड हे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून परिचीत आहेत. एकीकडे फुलचंद कराड यांची नाराजी तर दुसरीकडे शिवसंग्रामचा जिल्ह्यात काम न करण्याचा निर्णय यामुळे पंकजा मुंडे यांना फटका बसण्याची चिन्हं आहेत.
संबंधित बातम्या
प्रकाश आंबेडकर-विनायक मेटेंमध्ये गुफ्तगू, नव्या समीकरणांचे संकेत
पंकजांना धक्का देण्याच्या नादात बीडमध्ये शिवसंग्रामच फुटणार?