खरं खोटं नक्कीच बाहेर येईल, नालासोपाऱ्यातील राड्यानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया
सध्या भाजप आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही गटात तुफान राडा पाहायला मिळत आहे. आता याप्रकरणी विनोद तावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Vinod Tawde First Reaction : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडत आहे. त्यातच आता नालासोपाऱ्यात मोठा राडा झाला आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरलं आहे. विनोद तावडे यांच्यासह भाजपचे नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांना विवांता हॉटेलमध्ये घेरलं आहे. यामुळे सध्या भाजप आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही गटात तुफान राडा पाहायला मिळत आहे. आता याप्रकरणी विनोद तावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
विनोद तावडे यांनी या प्रकरणानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी. सीसीटीव्ही फुटेज चेक करावे. त्यात खरं खोटं नक्कीच बाहेर येईल, असे विनोद तावडे म्हणाले.
विनोद तावडे काय म्हणाले?
“पोलिसांनी चौकशी करावी. सीसीटीव्हीची चौकशी करा. मी 40 वर्षापासून राजकारणात आहे. अप्पा ठाकूर मला ओळखतात, क्षितीज यांनाही माहीत आहे. सर्व पक्ष मला ओळखतात. वास्तव स्पष्ट आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे.
मी इथे आलो होतो. समोरच्या मित्र पक्षांचा समज झाला की मी पैसे वाटतो. मी म्हटलं चेक करा, काहीच हरकत नाही. आप्पा हितेंद्र ठाकूर आले. पैसे वाटप होत असेल तर निवडणूक आयोग चौकशी करेल. सीसीटीव्ही फुटेज आहे. निवडणुकीच्या कामाबाबतची माहिती देण्यासाठीची बैठक आयोजित करण्यात आली होती. निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीपर्यंत यंत्रणा हे सही कशी करायची, ऑब्जेक्शन कसं घ्यायचं हे सांगत असतात”, असे विनोद तावडे म्हणाले.
नेमकं काय घडलं?
विरारमध्ये आज दुपारी १.३० च्या सुमारास मोठा राडा झाला. भाजप नेते विनोद तावडे यांनी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. यामुळे विरार पूर्वमधील विवांत हॉटेलमध्ये बविआ-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरले.
विरार पूर्व भागातील मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये हा सर्व राडा गेल्या तीन तासांपासून सुरु आहे. यावेळी भाजपचे स्थानिक उमेदवार राजन नाईक आणि काही पदाधिकारीही उपस्थित होते. विनोद तावडे हे या पदाधिकाऱ्यांना मतदारांना वाटण्यासाठी 5 कोटी रुपये घेऊन आले होते, असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विनोद तावडे ज्या विवांत हॉटेलमध्ये थांबले होते, तिथे हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली. बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरले. त्यांच्याकडे काही रक्कमही सापडली. यावेळी बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.