सांगलीत ‘मविआ’चा टप्प्यात कार्यक्रम, विशाल पाटलांनी घेतला मोठा निर्णय!
खासदार विशाल पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सांगली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होत आहे.
खासदार विशाल पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सांगली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसकडून यावेळी पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून सुधीर गाडगीळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे काँग्रेच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. दरम्यान विशाल पाटील यांनी आता काँग्रेसच्या बंडखोर आमदार जयश्री पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. जयश्री पाटील या माझ्याच उमेदवार आहेत, त्यांना निवडून द्या असं वक्तव्य विशाल पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता मविआची धाकधूक वाढली आहे.
जयश्री पाटील यांनी आज भव्य शक्ती प्रदर्शन करत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. सांगलीमध्ये त्यांची भव्य सभा झाली. या सभेला खासदार विशाला पाटील आणि त्यांचे भाऊ प्रतीक पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना विशाल पाटील यांनी म्हटलं की, मी सर्वांची क्षमा मागतो. जयश्री पाटील यांना उमेदवारी मिळवून देऊ शकलो नाही. विश्वजित कदम आणि आम्ही कमी पडलो.
आमच्या वसंतदादा कुटुंबाला एकदा ही काँग्रेस पक्षकडून उमेदवारी मिळाली नाही. आमच्या घराण्यानं नेमकी काय चूक केली हे आम्हाला अजूनपर्यंत काळालं नाही. आम्ही निष्ठा सोडली नाही, मात्र सातत्यानं आमच्या घराण्यावर अन्याय होत आहे. मी ज्यावेळी खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी जयश्री पाटील या सर्वात पुढे होत्या, मग माझ्या मनात प्रश्न आता आता त्यांच्या सभेला मी का जाऊ नये? ही महाविकास आघाडी फक्त तीन पक्षाची नाही तर त्यात अनेक घटक पक्ष आहेत. मी पण अपक्ष म्हणून महाविकास आघाडीसोबतच आहे. काँग्रेसनं दिलेला उमेदवार भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी सक्षम नाही, त्यामुळे आपण उमेदवार दिला. जयश्री पाटील या आपल्याच उमेदवार आहेत, त्यांना मतदान करा असं विशाल पाटील यांनी म्हटलं आहे.