चर्चा सुरूये मारकडवाडीची, पण महाराष्ट्राच्या ‘या’ गावातील ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान घेऊन मोकळे
सध्या मारकडवाडीचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घ्यावं अशी येथील नागरिकांची मागणी आहे. मात्र या मागणीसाठी प्रशासन तयार नसल्यानं वातावरण चांगलंच तापलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील नागरिकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. आम्हाला ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान करण्याची (मॉक पोल) परवानगी देण्यात यावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र या मतदान प्रक्रियेला प्रशासनाकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे गावातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या गावात उत्तम जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. प्रत्येकवेळी गावातून जानकर यांना मतांची लीड मिळाली आहे. मात्र यावेळी राम सातपुते यांना गावातून मोठ्या प्रमाणात मतदान झालं, त्यामुळे ग्रामस्थांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आम्हाला बॅलेट पेपरवर चाचणी मतदान करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या गावाला भेट दिली. शरद पवारांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. मारकडवाडीमधील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचा ( मॉक पोलिंग) चा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू केल्यामुळे मॉक पोलिंग होऊ शकलं नाही. यावर आता शरद पवार यांनी एक पर्याय सूचवला आहे. तालुक्याच्या सर्व गावात ठराव करा. आम्हाला ईव्हीएमवर मतदान नको. जुन्यापद्धतीने मतदान करायचं आहे असा. आणि त्या ठरावाची प्रत तुम्ही उत्तम जनकर यांच्याकडे द्या, त्यावर आम्ही निर्णय घेऊ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान एकीकडे मारकडवाडीत मॉक पोलिंगवरून गोंधळ सुरू असतानाच दुसरीकडे नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील असलोद गावात बॅलेट पेपरवर मतदान झालं आहे. मात्र हे मतदान निवडणुकीच्या मतदानासाठी नव्हतं तर ते दारू बंदीसाठी झालं आहे. या गावातील 1216 पैकी 677 महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दारू बंदीसाठी महिलांनी मतपत्रिकांवर मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीचा निकाल काय लागणार? गावात दारू बंदी होणार की नाही होणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.