दसरा मेळाव्याआधीच शिंदे गट देणार उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का, मंत्री उदय सामंत यांनी काय केला गौप्यस्फोट?
पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच चांगलं काम करत आहेत त्यामुळे विरोधकांना पोटशूळ ऊठलाय. त्यांनी इलाज करून घ्यावा. चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर पक्ष नवीन जबाबदारी टाकत असतील तर तो त्यांचा मोठेपणा आहे. ते सिनिअर आहेत आणि त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यावा हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे.
मुंबई : 17 ऑक्टोबर 2023 | मराठा समाजाला अपेक्षित असेच आरक्षण मुख्यमंत्री देतील. त्यात कोणताही दूजाभाव नसेल. मुख्यमंत्री आणि सरकारवर कोणताही दबाव नाही. ओबींसी यांच्याबद्दलही निर्णय घेतला जाईल. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळावे ही सरकारची भूमिका आहे. यावर सरकार नक्कीच तोडगा काढेल. त्यामुळे विरोधकांना गळे काढायची गरज नाही, असा टोला मंत्री उद्या सामंत यांनी विरोधकांना लगावला. आणखी दोन दिवस थांबा पाहा काय होतंय ते, असा इशाराही त्यांनी ठाकरे गटाला दिला.
उत्तर देत बसण्यापेक्षा
लोकसभेपुर्वी कोणताही भूकंप होणार नाही. जो व्हायचा होता तो झालाय आणि तो आम्हीच केलाय. आता काही एक होणार नाही. त्यामुळे विनायक राऊत यांनी भविष्यवाणी करत रहावे. मुख्यमंत्री यांना बदनाम करण्याचं काम रोज सकाळी सुरु आहे. मात्र, त्याला उत्तर देण्याची गरज नाही. उत्तर देत बसण्यापेक्षा महाराष्ट्रात किती विकासकामे केली हे दाखवणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
आम्ही जनतेसाठी सरकार चालवतो.
आम्ही टीका टिपणीकडे लक्ष देत नाही. आम्ही जनतेसाठी सरकार चालवतो. परिवहन खाते हे तोट्यात चालणारे मंडळ होतं. पण, संबंधित खात्यामध्ये उतरून काम केलं तर कसं चमकत ते काम आम्ही केलं. मागच्या काही वर्षात st कडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे ते मंडळ तोट्यात आले. 300 कोटीं रुपये द्यायचा निर्णय झाला होता पण त्याची अंमलबजावणी शिंदे फडणवीस सरकारने केली.
याला जनतेत उतरून केलेलं काम म्हणतात
75 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना 50% सूट दिली. 31 विभाग नुकसानीत होते. त्यातले 18 विभाग फायद्यात आले आहेत. बीड, परभणी विभागात 3 कोटींचा नफा झाला. नव्या आधुनिक गाड्या मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले. सरकारने टाकलेले हे फार मोठं पाऊल आहे. Msrdc ही आता 10-12 हजार कोटीं नफ्यात आहे. याला जनतेत उतरून केलेलं काम म्हणतात, असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला.
ज्यांनी कामे केली नाही त्यांनाच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस असे तिघेजण एकत्रित बसून चर्चा करून निर्णय घेतात. त्यांनी घेतलेले निर्णय आम्ही मान्य करतो आणि त्यापद्धतीने पुढे काम करतो. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये आम्हाला काही तोफांची गरज लागणार नाही. आमची विकास कामेच इतकी झाली की तोफांचीं गरज भासणार नाही. ज्यांनी कामे केली नाही त्यांनाच तोफांची गरज लागते. उद्धव ठकारे यांनी नवी कार्यकारिणी जाहीर केली. मात्र, नव्या कार्यकारिणीतील काही जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोटही मंत्री उद्या सामंत यांनी केला.