“अंबानीचं घर हे वक्फच्या जमिनीवर”, जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा दावा काय?
लोकसभेत सादर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकावरून जोरदार राजकीय वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला असून अंबानींचे घर वक्फच्या जमिनीवर असल्याचा दावा केला आहे. विरोधी पक्षांनी विधेयकाचा निषेध केला आहे तर भाजपला सहयोगी पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे.

आज लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर होत असताना मोठा गोंधळ झाला. यावर चर्चा करण्यासाठी आठ तास देण्यात आले आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयकाला इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांनी विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. तर विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारला ‘एनडीए’तील नितीशकुमार यांच्या जनता दल (संयुक्त), तेलुगु देसम आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचा पाठिंबा आवश्यक आहे. या तिन्ही पक्षांनी विधेयकाच्या समर्थनार्थ पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. आता या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.
जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकावर भाष्य केले. “आपण वक्फ बोर्डला विरोध कशाला करायचा? एकदा जमीन वक्फ करण्यात आली म्हणजेच समाजासाठी दान करण्यात आली की परत ती हस्तांतरित करण्यात येणार नाही. आता कायदा करायचा असेल तर असो करा की या जमिनीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही. त्यांच्या वाड वडिलांनी वक्फला दान केलेल्या जमिनी आहेत”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“अंबानीचं घर हे वक्फच्या जमिनीवर”
“लोकांच्या धार्मिक विषयात जायची काय गरज आहे. संविधानाचं उल्लंघन करण्याच काम सुरू आहे. आता आपल्याकडे दक्षिणेतील मंदिराकडे भारताला श्रीमंत करतील असं दुप्पट सोनं आहे. मग आपण वक्फ बोर्डला विरोध कशाला करायचा? एकदा जमीन वक्फ करण्यात आली, म्हणजेच समाजासाठी दान करण्यात आली. परत ती हस्तांतरित करण्यात येणार नाही. आता कायदा करायचा असेल तर असो करा की या जमिनीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही. त्यांच्या वाड-वडिलांनी वक्फला दान केलेल्या जमिनी आहेत. अंबानीचं घर हे वक्फच्या जमिनीवर आहे”, असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“किरण रिजीजू आम्ही काय वेडे आहोत का?”
“मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी कायद्याचा दुरुपयोग केला. आता दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील जमिनी देखील मोकळ्या बाजारात येणार आहे. मी केवळ यावर हसेल कारण ते म्हणतात की संसद वक्फच्या जागेवर आहे. अरे इंग्रज काळापासून संसद त्याठिकाणी आहे. उगाच चुकीची माहिती पसरवू नका. किरण रिज्जू सारखा माणूस म्हणतो की उद्या हे संसदेच्या जमिनीवर हक्क सांगतील. किरण रिजीजू आम्ही काय वेडे आहोत का? सरकारचा एक जबाबदार मंत्री सभागृहात ऑन रेकॉर्ड चुकीची वक्तव्य करतो आणि हे वक्तव्य जगभर जात आहे. आता यावर काय बोलायचं?” असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
“दोन्ही राष्ट्रवादी कामाने आणि विचाराने वेगळे”
“आता माझा सरकारला सवाल आहे की हिंदू मंदिरात असलेले अब्जो रुपयांचे सोने आहे. आता हे सोनं तुम्ही ताब्यात घेणार का? मला सरकारने उत्तर द्यावं. अजित पवार काय म्हणाले मला माहिती नाही. दोन्ही राष्ट्रवादी कामाने आणि विचाराने वेगळे आहे. आम्ही शरद पवारांच्या विचाराने पुढे चाललो आहे. गांधी नेहरू यांच्या विचाराने जात आहोत”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.