“बसवराज तेली हे आष्टीचे जावई, त्यांचे सुरेश धसांसोबत…”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली हे या नवीन एसआयटीचे प्रमुख आहेत. आता वाल्मिक कराड यांची पत्नी मंजिली कराड हिने बसवराज तेली यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडला 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी नेमलेली एसआयटी समिती रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी ७ नवीन अधिकाऱ्यांची एसआयटी समिती स्थापन करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली हे या नवीन एसआयटीचे प्रमुख आहेत. आता वाल्मिक कराड यांची पत्नी मंजिली कराड हिने बसवराज तेली यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मंजिली कराड यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. ते शीतल तेली यांचे पती असून त्या IAS अधिकारी आहेत. सुरेश धस यांचे ते जवळचे आहेत, असा आरोप मंजिली कराड यांनी केला आहे. त्यामुळे SIT मधील अधिकारी बदला, अशी मागणी मंजिली कराड यांनी केली आहे.
“सुरेश धस आणि बसवराज तेली यांचे CDR काढा”
“बजरंग सोनवणे हे निवडून येण्यासाठी माझ्या पतीनं मदत केली. दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराड याला संपवणे गरजेचे असल्याने त्यांना बळीचा बकरा केला जात आहे. SIT मधील आठही अधिकारी बदला. यात कोणाचेही नातेवाईक नसावे. CDR काढण्याची हौस आहे ना तर सुरेश धस आणि बसवराज तेली यांचे CDR काढून बघा, किती फोन झाले आहेत ते कळतील”. असे मंजिली कराड म्हणाल्या.
“माझ्या पतीचा याच्याशी काहीही संबंध नाही”
“माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करुन SIT चे लोकं काहीही करु शकतात. संतोष देशमुख हत्या प्रकरण जेव्हा घडले, त्यावेळी माझे पती परळीमध्ये नव्हते. माझ्या पतीचा याच्याशी काहीही संबंध नाही. सरकार स्थापन झाले तेव्हा दोन मंत्री हे वंजारी आमच्या अल्पसंख्यांक समाजाचे झाले. हे मराठा समाजाच्या नेत्यांना पटलं नाही. सुरेश धस यांचं स्टेटमेंट आहे, मी तुमची माती करेल. बजरंग सोनावणे यांनी माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. वंजारी समाज अल्पसंख्यांक असल्याने समाजाला दाबण्यासाठी हे सगळं सुरु आहे. गरीब समाज आणि लोकांना टार्गेट करू नका. ज्यांचा खून झाला त्यांचा आणि माझ्या नवऱ्याचा काहीही संबंध नाही. त्यांचा साधा एक फोनही झालेला नाही. ते एकमेकांना ओळखत देखील नाही. आमच्या नेत्याना संपवण्यासाठी सगळं सुरु आहे”, असे मंजिली कराड म्हणाल्या.