मराठा आणि ओबीसी आरक्षणावर प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान, म्हणाले, दोघांचं ताट…
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आणि ओबसींच्या आरक्षणाचे ताट वेगवेगळे असले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. दोघांनाही एकत्र आरक्षण देऊ नये आणि दोघांनाही भिडवत ठेवू नये, असंही प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलं आहे. ओबीसी नेत्यांचं वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणावरून आज मोठं विधान केलं आहे. मराठा आणि ओबीसींचं ताट वेगळं असलं पाहिजे, असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज वडीगोद्रीत जाऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते उपोषण करत आहेत. त्यामुळे आंबेडकर यांनी त्यांची विचारपूसही केली.
मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचे ताट वेगळे ठेवले पाहिजे. मराठा आणि ओबीसींना एकमेकांसमोर भिडवत ठेवलं जात आहे. विधानसभेपर्यंत त्यांना भिडवत ठेवलं जाईल, अशी माझी धारणा आहे. कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल तर आरक्षण मिळाले पाहिजे. पक्षाची सत्ता यावी असं वाटत असेल तर सलोख्याची भाषा वापरली गेली पाहिजे, असं प्रकाश आंबडेकर म्हणाले.
संविधान वाचलं तरच…
मराठा असो की ओबीसी… संविधान वाचलं तरच सर्वांना आरक्षण आहे. भाजप किती संविधान बदलणार? आता संविधानाच्या बाजूने निकाल लागला आहे. जनतेचा कौल महाविकास आघाडीकडे गेला आहे. ओबीसींनी संविधानावर विश्वास ठेवला तर आरक्षण वाचलं जाऊ शकतं, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
सग्यासोयऱ्याची व्याख्या करा
मनोज जरांगे यांच्याशी माझं मागे बोलणं झालं होतं. त्यावेळी सगेसोयऱ्याची व्याख्या तुम्ही करा. किंवा कुणाकडून तरी करून घ्या, असं मी सांगितलं होतं. जोपर्यंत व्याख्या काय होते हे कळत नाही, व्याख्या काय आहे हे समजत नाही, तोपर्यंत नेमकं काय ते कळणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
परिस्थिती स्फोटक
राज्यात सामाजिक सलोखा राहिला पाहिजे. तुम्ही उपोषण सुरू ठेवायला हरकत नाही. पण पाणी घ्या. पाणी पिऊन उपोषण करा. तुम्ही पाणी घेत राहाल ही आशा आहे. सध्या तरी आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाकडून कोणतंही पाऊल पडताना दिसत नाही. ओबीसी आणि मराठा समाज अनेकवेळा आमनेसामने आला आहे. परिस्थिती स्फोटक असल्याची जाणीव मी अनेकवेळा शासनाला करून दिली आहे. शाश्वत आरक्षण निघून जाते की काय अशी भीती भटक्या विमुक्तांनाही वाटत आहे. याबाबत शासनाने चर्चा केली पाहिजे. राजकीय पक्षांनी भूमिका घेतली पाहिजे. या परिस्थितीतून मार्ग काढला पाहिजे, असं सांगतानाच आरक्षणावर आम्ही आमची भूमिका आधीच जाहीर केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.