वर्धा : वाढत्या शहरीकरणामुळे आरोग्य सुविधांचे अंतर वाढत आहे. कार्यरत आरोग्य यंत्रणेवर ताणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत. त्यांची फरफट थांबावी, याकरिता आता आरोग्य यंत्रणेला २० शहरी आरोग्य वर्धिनी (Arogya Vardhini) केंद्रांची बळकटी मिळणार आहे. रुग्णालयात वाढत्या गर्दीमुळे उपचार मिळविताना अडचणी येत असल्याच्या नागरिकांच्या (Nagarik) तक्रारी आहेत. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन आमदार रणजित कांबळे यांनी पालकमंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या माध्यमातून जिल्ह्यात 20 शहरी आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळविली आहे. या आरोग्यवर्धिनी केंद्रांद्वारे रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जाणार आहेत.
वर्धा जिल्ह्याच्या देवळी न. प. क्षेत्रात 1, पुलगाव न. प. क्षेत्रात 2, हिंगणघाट न. प. क्षेत्रात 4, वर्धा न. प. क्षेत्रात 6, नगर पंचायत कारंजा (घाडगे) 1, समुद्रपूर नगर पंचायत 1, सिंदी (रेल्वे) 1, आष्टी नगर पंचायत 1, सेलू नगर पंचायत 1 आणि आर्वी न.प. क्षेत्रात 2 केंद्रांना अश्या एकूण 20 केंद्राना मान्यता देण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी एक एमबीबीएस डॉक्टर, एक कर्मचारी परिचारिका, आरोग्य सेवक, एक परिचर यांची तातडीने नियुक्ती करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही सर्व केंद्रे एक ते दीड महिन्यात सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
वर्धा शहराची लोकसंख्या, विस्तार झपाट्याने वाढत आहे. शहरांचा विस्तार होत आहे. वेळेवर रुग्णालयात पोहोचण्यासाठी अडथळ्यांची शर्यतही पार करावी लागत आहे. शहरांमध्ये असलेल्या जिल्हा सामान्य, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांमध्ये गर्दीही वाढत आहे. छोटी आरोग्य केंद्रे सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मोठ्या शासकीय रुग्णालयात किरकोळ आजारांच्या रुग्णांना शहरी आरोग्य केंद्रातच उपचार घेता येणार आहेत. शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल, असे आमदार रणजित कांबळे यांनी सांगितले. या आरोग्य केंद्रांमुळं वर्धा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे. अस्तित्वात असलेली आरोग्य यंत्रणा तशीच राहणार आहे. शिवाय नगरपंचायत क्षेत्रात हे आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू होणार आहेत.