वर्धा : प्रत्येक गावात अंत्यसंस्कारासाठी श्मशानभूमीच्या विकासाकरिता जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, जिल्ह्याच्या 51 गावांत आजही स्मशानभूमी नसल्याचं उघडकीस आलय. एवढंच नव्हे तर अनेक गांवात निर्माण करण्यात आलेले श्मशान शेड जीर्ण झाले आहे. यामुळे उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर (Citizens) आली आहे. अंतिम प्रवासातही स्मशानभूमीच्या दुर्दशेचे फेरे घ्यावे लागत आहेत. मृत्यूनंतरही (Bodies) नरक यातना सोसावी लागत असल्याचे चित्र आहे. जीवन जगत असताना संघर्ष (Conflict) करावा लागतो. पण, मृतदेहांनाही यातना सहन कराव्या लागत असल्याचं चित्र आहे. उघड्यावर अंत्यसंस्कार करावा लागत आहे. पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो. यावर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक करत आहेत.
वर्धा जिल्ह्यात एकूण 520 ग्रामपंचायत आहे. यापैकी 51 गावांतील स्मशानभूमीत अजूनही शेड नसल्याने उघड्यावरच दहन करावे लागत आहे. ग्रामीण भागात अजूनही अंत्यसंस्कारासाठी पुरेशी सुविधा नसल्याने मृतदेहांची अवहेलना होत आहे. बऱ्याच गावांत बनविण्यात आलेले स्मशान शेड हे जीर्ण झाल्याने उघड्यावर मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे सोपस्कार आटोपावे लागतात. याकडे प्रशासन लक्ष देत नाहीय, अशी नागरिकांची ओरड आहे. गावांत स्मशानभूमी शेड व सौंदर्यीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्रदान केला जातो. मात्र, आजही अनेक गावांत स्मशानभूमी शेडसह अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे चित्र आहे.
सप्टेंबर 2021 मध्ये जवळपास 58 गावांत स्मशानभूमी शेडची वानवा होती. मागील आठ महिन्यांत केवळ सात गावांत स्मशानभूमी शेड निर्माण केल्याची माहिती आहे. कामाची गती अत्यंत संथ असल्याने ग्रामिणांमध्ये संताप उफाळला आहे. सद्यस्थितीत 51 गावांत आजही स्मशानभूमी शेडचा अभाव असल्याचे चित्र आहे. वर्धा तालुक्यातील वागदरा, देवळी तालुक्यातील हेटी, कोलावस्ती, पारधी बेडा, कवठा रेल्वे येथे स्मशानशेड नाही. आर्वी तालुक्यातील वागदा, महाकाळी, पारगोठाण, सावद, सहेली, डबलीपूर, बोरखेडी, तांडा, लहानादेवी, येथे आष्टी तालुक्यातील तारासावंगा, वाडेगाव, माणिकवाडा, टूमनी, रानवाडी, पेठ अहमदपूर, दलपतपूर, पेठ, सिरसोली येथेही स्मशानशेड नाही. कारंजा तालुक्यातील आंभोरा, बांगडापूर, ढगा, हेटी, धावसा, भालेवाडी, चिंचोली, महादापूर, पांजरा बंगला, किन्हाळा समुद्रपूर तालुक्यातील धानोली, परसोडी, जिरा, रामपूर, सुलतानपूर, सुकळी, बोथली, रज्जापूर, पारडी या गावांना स्माशानशेडची प्रतीक्षा आहे. हिंगणघाट तालुक्यातील गांगापूर, चानकी, मानकापूर, हिवरा बेघर वस्ती, कडाजना, कुकाबर्डी, कुंभी, वरुड व कवडघाट या गावात स्मशानभूमी शेडचे अद्यापही निर्माण झालेले नाही.