नागपूर : प्राध्यापिका अंकिता पिसुंडे (Ankita Pisunde) जळीतकांड प्रकरणात आरोप सिद्ध झालेय. आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळेवर खुनाचे आरोप सिद्ध झालेत. हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने (District and Additional Sessions Court) खुनाचे आरोप सिद्ध केलेत. यावर अंकिता पिसुंडे यांच्या आई – वडिलांनी समाधान व्यक्त केलंय. उद्या जास्तीत जास्त शिक्षा सुनावली (Sentenced) जाईल. अशी अपेक्षा अंकिताची आई संगीता व व वडील अरुण यांनी व्यक्त केलीय. दोन वर्षांनंतर का होईना अंकिताला न्याय मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर उद्या निकाल सुनावल्यानंतर हायकोर्टात अपील करणार असल्याची माहिती बचाव पक्षाच्या वकिलांनी दिली. त्यामुळं आरोपीला नेमकी शिक्षा काय मिळते आणि त्यानंतर पुन्हा हायकोर्टात खटला सुरूच राहणार का, याबाबत साशंकता आहे.
बहुचर्चित प्रा. अंकिता पिसुंडे जळीतकांड प्रकरणात हिंगणघाट जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपींवर खुनाचे आरोप सिद्ध केलेत. हा खटला मीडियात चालला, पुरावे नसताना आरोपीला दोषी ठरवलं. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार” असं बचावपक्षाचे वकील भुपेंद्र सोने यांनी सांगितलं.
अंकिता पिसुड्डे हिंगणघाटच्या महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापिका होती. अंकिता आणि आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी होते. अंकिता पिसुंडे 3 फेब्रुवारी 2020 रोजी गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने जात होती. आरोपी विकेश नगराळेने पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले. अंकिताला नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेतला. आरोपीचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. तू माझ्याशी लग्न का केलं नाही, म्हणून त्याने सूड उगविला. या प्रकरणानंतर हिंगणघाट परिसरात आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली होती. अखेर दोन वर्षांनंतर आरोपी दोषी ठरविला गेला.