एटीएम कटिंग करून रोख रक्कम पळवली, येथील अट्टल टोळी तेलंगणातून जेरबंद
वर्ध्याच्या वायगाव (निपाणी ) येथील एटीएम मशीन गॅस कटरनं कापला. 23 लाख 78 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी पळविले होते. तसंच बोरगाव इथलं एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता.
टीव्ही ९, वर्धा : एटीएम कटिंग करून रक्कम पळविणार्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. एटीएम कटिंग करून 24 लाख रुपये लंपास करणार्या हरियाणातील अट्टल टोळीला तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथून वर्धा पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांनी मोबाईल, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी फायटर, तीन एटीएम कार्ड, दोन फेक नंबर प्लेट, एक वाहन असा मुद्देमाल जप्त केलाय.
वर्ध्याच्या वायगाव (निपाणी ) येथील एटीएम मशीन गॅस कटरनं कापला. 23 लाख 78 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी पळविले होते. तसंच बोरगाव इथलं एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता.
चोरट्यांनी रेकी करून चोरीच्या वाहनाचा वापर केल्याचं आढळून आलं. तपासादरम्यान आरोपी हरियाणा येथील नुह मेवात जिल्ह्यातील असल्याचे दिसून आले. हरियाणा येथे एक तपास पथक पाठवून माहिती गोळा करण्यात आली.
आरोपी धाब्यावर असल्याची माहिती
तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे यातील आरोपी तेलंगणा राज्यातील निझामाबाद येथे असल्याचे दिसून आले. त्यावरून वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेथे जावून पाहणी केली. एका मेवात धाब्यावर यातील आरोपी थांबून असल्याचे दिसून आले.
जंगलात पळून जात होते आरोपी
धाब्यावर छापा घालून तेथून दोन आरोपींना ताब्यात घेतलं. दोन आरोपी धाब्याचे मागील बाजूने जंगलात पळून जात होते. त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सांगितलं.
अशी आहेत आरोपींची नावं
पोलिसांनी अटक केलेल्यांची नावं हरियाणातील साबीर लियाकत खान व अन्सार सुले खान अशी आहेत. हे दोघेही घोरावली जिल्हा पलवल येथील आहेत. इरफान शकूर शेख हा सौफना जिल्हा पलवल येथील आहे. तर शेर मोहम्मद शेख हा बावला जिल्हा नुहू येथील आहे. या चारही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.