वर्धा : जे नुकसान झाले ते दाखवा अन्यथा उभा गाडीन आणि स्वतः जोड्याने मारीन, अशी तंबी भाजपा आमदार दादाराव केचे (Dadarao Keche) यांनी सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंत्यांला दिली आहे. कारंजा तालुक्यात पावसामुळे झालेल्या पीकांच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंत्यांना त्यांनी लक्ष्य केले. जिल्ह्यात सगळीकडे पावसाने (Wardha rain) हाहाकार उडवला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरीदेखील हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लोकप्रतिनिधी पाहणी करत आहे. अशातच आर्वी विधानसभा मतदार संघांचे भाजपा आमदार दादाराव केचे यांनीदेखील कारंजा तालुक्यात पाहणी दौरा केला. दरम्यान, शेतकऱ्यांवर (Farmers) अन्याय होता काम नये. जे नुकसान झाले ते दाखवा अन्यथा उभा गाडीन आणि स्वतः जोड्याने मारीन, अशी तंबी अधिकाऱ्यांना दिली.
कारंजा तालुक्यातील पारडी शिवारात भाजपा आमदार दादाराव केचे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी ते संतापले. काही शेतकऱ्यांनी सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता हे शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरीच्या नुकसानीबाबत अहवाल बनविताना भेदभाव करत असल्याचा आरोप केला. यावर आमदार दादाराव केचे संतप्त झाले. आमदार केचे यांनी कनिष्ठ अभियंत्याला बोलवत तुम्ही शेतकऱ्यांच्या विहिरी गायब केल्या, तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करता. आताही करणार काय अन्याय, असे विचारत उभा गाडीन आणी कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला तर स्वतः जोड्याने मारीन हे लक्षात ठेवा, अशी तंबीच दिली त्यांनी दिली.
तुम्ही शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरीच्या नुकसानीचा अहवाल बनविताना वीस हजार द्या, दहा हजार द्या, असे म्हणता. ज्यांचे पैसे पोहोचले त्यांच्या विहिरी बरोबर दाखविल्या जातात. यामुळे आता असे चालणार नाही. शेतकऱ्यांवर अन्याय नको, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकप्रतिनिधींकडूनही पाहणी दौरे करून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मात्र संकटात सापडलेल्या नागरिकांना आता तातडीने मदत मिळावी, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.