Wardha Flood : वर्ध्यात पावसामुळे अनेक गावांना पुराचा वेढा, शाळा, महाविद्यालयांना सुटी, अनेक गावांचा संपर्क तुटला
आमदार कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. थेट जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत मदतीचे आदेश दिले.
वर्धा : वर्धा जिल्ह्यात रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक गावांना पुराचा वेढा दिलाय. पावसामुळे जिल्ह्याच्या शाळा (school) महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने पावसाची तीव्रता पाहता हा निर्णय घेतला. जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद आहेत. हिंगणघाट (Hinganghat) तालुक्यातील अलमडोह, मनसावली, सोनेगाव, कान्होली या गावांना पुराचा वेढा आहे. देवळी, सेलू (Selu) तालुक्यातीलाही अनेक गावांचा संपर्क तुटला. आर्वी तालुक्यातील सोरटा, पानवाडी सह काही गावात पाणी शिरला. या गावांना चाहूबाजूनी पुराने घेरले. सतत सुरु असलेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. नागरिकांना उंचीवर थांबायचे आवाहन प्रशासनानं केलंय. गावाला संपूर्ण बाजूने पूर असल्याने बचावकार्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
वर्धा-राळेगाव मार्ग बंद
वर्धा जिल्ह्यात 12 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हिंगणघाट, देवळी, वर्धा, आर्वी तालुक्यातील नदी काठावरील गावांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यशोदा नदीला पूर आल्याने सरुळ, टाकळी, आलोडा, अलमडोह, भोजनखेडा, चाणकी गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटलाय. वर्धा-राळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. आर्वी तालुक्यातील बाकळी नदीला पूर आल्याने वर्धमनेरी येथील पूल पाण्याखाली गेलाय. आर्वी – तळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय.
आमदार कांबळेंनी मुख्यमंत्र्यांशी साधला संपर्क
वर्धा जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुलगाव, देवळी विधानसभा मतदारसंघाच्या अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. हिंगणघाट, देवळी आणि वर्धा तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्यात आहे. या नागरिकांना रेस्क्यू करण्यासह तात्काळ मदत गरजेची आहे. यामुळे आमदार कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. थेट जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत मदतीचे आदेश दिले. मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या. पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याकरिता एनडीआरएफ आणी एसडीआरएफच्या तुकड्या सुद्धा बोलाविण्यात आल्या आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे मतदान असल्याने मुबंईला उपस्थित राहणे गरजेचे आहे. यामुळे मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना पुराच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचनाही मी दिल्या आहे, अशी माहिती आमदार कांबळे यांनी दिली.